Home | National | Delhi | Central agencies have persecuted me for 12 years: PM Narendra Modi

काँग्रेसच्या इशाऱ्यावरून केंद्रीय संस्थांनी मला 12 वर्षे छळले : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था | Update - Jan 13, 2019, 09:59 AM IST

मोदी म्हणाले, मला त्रास देऊनही कोणत्याही एजन्सीजना गुजरातमध्ये बंदी नव्हती.

 • Central agencies have persecuted me for 12 years: PM Narendra Modi

  नवी दिल्ली- केंद्र सरकारवर सरकारी संस्थांच्या गैरवापराचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घणाघाती शब्दांत पलटवार केला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना तब्बल १२ वर्षे काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या यंत्रणांनी आपणास अनेक मार्गाने त्रास दिला, असे ते म्हणाले.

  आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड राज्यांनी सीबीआयच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यांची झोप उडण्यासारखे असे काय गौडबंगाल केले की, यांना सीबीआयची भीती वाटावी? असा प्रश्न त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपात या राज्य सरकारांना विचारला. ते म्हणाले, गुजरातचा मुख्यमंत्री असताना, काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांनी, रिमोटवर चालणाऱ्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल १२ वर्षे मला छळले. त्यांनी तर एकही संधी सोडली नव्हती. देशातील एक एजन्सी राहिली नाही, जिने मला छळले नाही, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला. तुरुंगाची साफ-सफाई चांगली करून घ्या, कारण पुढील आयुष्य तुम्हाला तुरुंगातच काढावे लागणार आहे, असा टोमणा काँग्रेस नेते मारत असत.

  माेदी म्हणाले, सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाने यूपीए सरकारचा एजेंडा मोदीला अडकवण्याचा होता, हे स्पष्ट झाले. तरीसुद्धा आम्ही सीबीआय अथवा अन्य संस्थांना गुजरातमध्ये घुसण्यास बंदी घातली नव्हती. आमचा सत्य व कायद्यावर विश्वास होता. परंतु हे लोक तर त्यांचे काळे कारनामे उजेडात आल्यामुळे घाबरलेले आहेत.

  कार्यकर्त्यांना म्हणाले, चौकीदार थांबणारा नाही, कारवाई करणार
  काळे धन व भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई केल्याने देशाचे राजकारण बदलत आहे. काँग्रेसची पोल उघडी झाली आहे. तेव्हा त्यांनी शिवीगाळ सुरू केली आहे. कट कारस्थाने सुरू आहेत. आता कितीही शिव्या घाला, खोटे बोला पण हा चौकीदार थांबणार नाही. मोदी म्हणाले, देशाच्या इतिहासात प्रथमच सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. २००४-२०१४ पर्यंत १० वर्षे देशाने भ्रष्टाचार व घोटाळ्यात गमावले. विरोधी पक्षाच्या महाआघाडीचा प्रयोग फसवा आहे. विरोधी पक्ष एकत्र येत आहेत कारण भाऊबंदकी व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे सरकार त्यांना हवे आहे. तर भाजपला संपूर्ण विकासासाठी एक मजबूत सरकार हवे आहे. काँग्रेसला राम मंदिराच्या मुद्यावर तोडगा नको आहे. यासाठी वकिलामार्फत त्यांनी अडथळे आणण्याचे काम सुरू केले आहे.

Trending