आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही : शरद पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून केंद्राने पाठवलेले पाहणी पथक रात्रीच्या अंधारात दुष्काळी पाहणी करत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळी उपाययोजनांबाबत अजिबात गंभीर नसल्याची बाब स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मालेगाव येथील भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रशांत हिरे, त्यांचे पुत्र अद्वय हिरे आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या वेळी त्यांनी मराठा आरक्षण टिकवणे ही मुख्यमंत्र्यांची परीक्षा असल्याचे भाष्यही केले.

 

पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थिती हाताळणीबाबत सरकारच्या कार्यपद्धतीबाबत चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने केंद्राला परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर सध्या केंद्राचे पाहणी पथक दुष्काळी दौऱ्यावर आले आहे. मात्र, हे पथक रात्रीची पाहणी करत असल्याचे आपल्याला समजले असून ही बाब योग्य नसल्याचे पवार म्हणाले. शिवाय दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार हव्या त्या उपाययोजना करताना दिसत नाही, असे सांगतानाच आघाडी सरकारच्या काळात आपण स्वतः दुष्काळी भागाचा दौरा केला होता. तसेच माजी मनमोहनसिंग यांनीही तातडीने मदत देऊ केल्याचे ते म्हणाले. तो अनुभव पाहता हे सरकार दुष्काळप्रश्नी पुरेसे गंभीर नसल्याची बाब त्यांनी नमूद केली.   

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोक न्यायालयात गेल्याबाबत त्यांना छेडले असता पवार म्हणाले की, न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटली नाही तर त्याविरोधात भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्यही त्याला आहे. शिवाय राज्य सरकारने ज्या आधारावर निर्णय घेतला त्या आधारे ते आपले म्हणणेही न्यायालयात मांडतील.

 

मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान  

मध्यंतरी आपण सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे एक भाषण ऐकल्याचे सांगत पवार म्हणाले की, या भाषणात ते म्हणाले आहेत की, पन्नास टक्क्यांच्या वर कुणालाही आरक्षण देता येणार नाही. आता आपल्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला देऊ केलेले आरक्षण टिकवावे लागणार आहे. ते धाडस मुख्यमंंत्री दाखवणार का? आता मुख्यमंत्री  फडणवीस यांची खरी परीक्षा असल्याचेही पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिमांच्या पाठीशी : पवार   
आघाडी सरकारने मुस्लिमांना आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला न्यायालयानेही मान्यता दिली. मात्र, हे सरकार धर्माच्या आधारे आरक्षण देणार नसल्याचे सांगत आहे. धार्मिक मुद्द्यावर भाजप नेतृत्वाच्या मनात काही वेगळी भावना आहे आणि ती राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल नाही, असेही त्यांनी सांगितले. शिवाय येत्या काळात आपला पक्ष मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.   

बातम्या आणखी आहेत...