आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय पथकाच्या प्रतीक्षेत जवसगावात दीड तास ताटकळले शेतकरी, 33 मिनिटेच पाहणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - केंद्रीय पथकाने बुधवारी बदनापूर तालुक्यातील दोन गावांमधील दोन शेतांची पाहणी करून जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौरा उरकला. जवसगाव येथे पथकाची वाट पाहत शेतकरी दीड तास थांबून होते. पथक आल्यानंतर त्यांनी २३ मिनिंटात जवसगावाची पाहणी आटोपती घेत बेथलम गाठले. येथेही एकाच शेतात १० मिनिटे पाहणी करून थेट विश्रामगृह गाठले. संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना दुष्काळ पाहणीचा हा फार्स कशासाठी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. 

 

जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बुधवारी केंद्राचे पथक जिल्ह्यात आले. यात नीती आयोगाचे सह सल्लागार मानश चौधरी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे एस.सी. शर्मा आणि ग्रामीण विकास विभागाचे एस.एन.मिश्रा यांचा समावेश होता. पूर्व नियोजनानुसार सकाळी ११ वाजता बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथून या पाहणी दौऱ्याला प्रारंभ होणार होता. मात्र पथक १२.३० वाजता जवसगाव शिवारात आल्याने येथील शेतकरी पथकाची वाट पाहत जवळपास दीड तास ताटकळले. पथकाने येथे सुवर्णा सुखदेव अंभारे यांच्या कपाशीच्या आणि बाजरीच्या शेताची पाहणी केली. चार एकरवर कपाशीची लागवड केली असताना केवळ दोन क्विंटल कपाशी हाती आली. त्यासाठी ३२ हजार रुपये खर्च झाला तर गतवर्षी याच शेतातून ८ क्विंटल कपाशी झाली होती, असे सुवर्णा अंभाेरे यांनी पथकातील सदस्यांना सांगितले. पथकातील अधिकारी शेतकऱ्यांशी हिंदी भाषेत बोलत होते तर शेतकरी त्यांच्याशी मराठीत बोलत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व आमदार नारायण कुचे यांनी दुभाषकाची भूमिका बजावली. जवसगाव येथील पाहणी उरकून पथक जालना तालुक्यातील बेथलम येथे पोहोचले. येथील शेतकरी प्रकाश जयसिंग निर्मळ यांच्या रबी ज्वारीच्या शेताची पथकाने पाहणी केली. १० मिनिटांत पाहणी उरकल्यानंतर पथकाने जालना शहरातील विश्रामगृह गाठले. जवसगाव आणि बेथलम या दोन्ही ठिकाणी मिळून पथकाने ३० ते ३५ मिनिटे पाहणी केली. त्यासाठी प्रशासनाची मात्र गेल्या तीन दिवसांपासून धावपळ सुरू होती. 
 
दुभाषकांची तारांबळ 
अधिकारी शेतकऱ्यांशी हिंदी भाषेत तर एकमेकांशी इंग्रजी भाषेत बोलत होते. त्यामुळे अधिकारी काय विचारत आहेत हे शेतकऱ्यांना कळत नव्हते तर शेतकरी काय म्हणताहेत हे अधिकाऱ्यांना कळत नव्हते. त्यामुळे जवसगाव येथे आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दुभाषकाची भूमिका बजावली. 

 

असे होते पाहणीचे स्वरूप 
पाहणीच्या वेळी पथकातील सदस्यांनी हे पीक कोणते, क्षेत्र किती, त्यासाठी किती खर्च आला, उत्पन्न किती मिळाले,पीक कर्ज मिळाले,आता उन्हाळ्यात काय काम करणार असे पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. शेतकऱ्यांनीही त्याची व्यवस्थित उत्तरे दिली. 

 

हा फार्स कशासाठी ? 
आपत्ती व्यवस्थापन आचारसंहितेनुसार राज्याने दुष्काळ जाहीर केल्यानंतर एकाच आठवड्यात केंद्रीय पथकाने पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र हे पथक सव्वा महिना उशिराने दुष्काळ पाहणी करत आहे. त्याचा अहवाल उच्चाधिकार समिती आणि तेथून गृहमंत्रालयाकडे जाईल. दुष्काळ जाहीर होताच उपाययोजना करणे अपेक्षित असते. पाहणीचा फार्स कशासाठी?. डॉ.संजय लाखे पाटील 

 

'मटकी'वरून सारेच निरुत्तर, इंग्रजी नाव कुणालाच आठवेना 
जवसगाव येथील महिला शेतकरी सुवर्णा अंभाेरे यांनी बाजरीच्या पिकात आंतर पीक म्हणून मटकीची पेरणी केली होती. यातील बाजरी आणि मटकी अशा दोन्ही पिकांची वाढच झाली नाही. चौधरी यांनी मटकीचे रोपटे हातात घेऊन हे कोणते पीक आहे, असे हिंदीत विचारले तेव्हा उपस्थितांनी मटकी असल्याचे सांगितले. चौधरी यांनी त्याचे इंग्रजी नाव विचारले असता सारेच निरुत्तर झाले.चौधरी यांनी दोन तीन वेळा हाच प्रश्न केल्यानंतर कृषी विभागातील एकास पाचारण करण्यात आले. त्यांनी मटकीला इंग्रजीत हॉर्स ग्रॅम म्हणतात, असे सांगत वेळ मारून नेली. 


परभणी : गुरुवारी येणार पथक 

दुष्काळग्रस्तांच्या अपेक्षा उंचावल्या 
परभणी | परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हातचा गेला. पाठोपाठ रब्बीच्या आशा पाण्याअभावी मावळल्या. केवळ ३२.३४ टक्के इतकीच रब्बीची लागवड झाली. त्यामुळे ६७.६६ टक्के रब्बीतील पेरणीच्या घटीने अपेक्षित उत्पन्नाचे तीनतेरा वाजले आहेत. आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. अशा दुष्काळी स्थितीत केंद्राचे पथक गुरुवारी दाखल होत असताना या पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेला मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. हे पथक गणेशपूर(ता.सेलू), पेडगाव(ता.परभणी) आणि रुढी (ता.मानवत) या गावांची व शेतशिवाराची पाहणी करणार आहे. शासनाने नऊपैकी सहा तालुके गंभीर दुष्काळी स्थितीतील असल्याचे जाहीर केले असले तरी उर्वरित तिन्ही तालुक्यांत दुष्काळाची दाहकता आहेच. पावसाच्या प्रमाणातील असमानतेच्या आधारे ही दुष्काळजन्य स्थिती जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात खरिपाच्या अखेरच्या दोन महिन्यांत व परतीच्या पावसाने दगा दिल्यानेे शेतकरी उत्पन्नाच्या बाबतीत अधिकच मागे गेेला. 
सरकारचा दावा : चारा पुरेसा; शेतकरी : आमच्याकडे चारा नाही 

 

प्रतिनिधी | औैरंगाबाद / गंगापूर 
केंद्रीय पथकाने गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी, मुरमी आणि सुलतानपूर या तीन गावांना भेट देत बुधवारी दोन तासांत दुष्काळी दौरा आटोपला. या वेळी शेतकऱ्यांनी पथकासमोर व्यथा मांडताना सांगितले की, सरकार म्हणतंय चारा आहे. पण आमच्याकडे चारा नाही. ग्रामीण भागात प्रति व्यक्ती २० लिटर पाणी मिळत आहे. शौचालये बांधली मात्र पाणी नाही, अशी अवस्था आहे. इतक्या कमी पाण्यात माणसे, जनावरांची कशी व्यवस्था होणार, असा सवाल करत मंत्र्यांनी यापूर्वी दौरे केले. मात्र काहीच मदत मिळाली नाही, असे सांगून राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या लबाडीवर बोट ठेवले. 

 

केंद्र शासनाच्या या पथकामध्ये केंद्रीय कृषी सहसचिव छावी झा, केंद्रीय जल समितीचे संचालक आर.डी. देशपांडे, भोपाळ राज्यातील कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के.तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची उपस्थिती होती 

 

कोरड्या टेंभापुरी धरणाची केली पाहणी 
दौऱ्याच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त कार्यालयात पथकाची बैठक झाली. यामध्ये दुष्काळाच्या बाबतीत सादरीकरण झाले. सुभेदारी विश्रामगृहावरून कोणते पथक कुठे जाणार हे ठरले. सव्वा अकरा वाजता दुष्काळी दौऱ्याला सुरुवात झाली. सुरुवातीला टेंभापुरी धरणाची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांनी नांदुर-मधमेश्वर प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी उपसा करून धरणात सोडण्याची मागणी केली. या वेळी झा यांनी या धरणावर किती गावच्या पाणी योजना आहेत. तसेच आता यांना पाणी कोठून दिले जाते, याची माहिती विचारली. 

 

मुरमीचे सरपंच विक्रम राऊत यांनी पथकासमोर गावची व्यथा मांडली. यापूर्वी दिवाकर रावते यांनी या गावचा दौरा केला होता. चारा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही चारा मिळत नाही. गाव हागणदारीमुक्त आहे. मात्र २० लिटर पाणी मिळत असल्यास शौचालयाचा वापर कसा करणार. केवळ आश्वासने देऊ नका लोकांना मदत हवी, असे राऊत यांनी सांगितले. 

तीन एकरांत फक्त दीड क्विंटल कापूस सुलतानपूर गावात पथकाने कापूस, तूर उसाची पाहणी केली. ऊस पूर्ण जळालेला होता. तुरीला शेंगा नव्हत्या. कापसाची वाढ खुंटली होती. युनूस शेख या शेतकऱ्यांच्या कापसाची पाहणी केली. शेख यांना तीन एकरात दीड क्विंटल कापूस झाला. एकरी पंधरा हजार असे ४५ हजार खर्च झाले. कापूस फक्त सात हजारांचा झाल्याचे त्यांनी सांगितले. पुंजाराम नीळ या शेतकऱ्याने कापूस लावला मात्र हाती काहीच आले नसल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...