आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ठसकेबाज लावण्यांनी रंगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबादसह जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सादर करून महोत्सवात रंग भरले. व्यावसायिक लावणी कलावंतांच्या तोडीचे लावणी सादरीकरण झाले. महोत्सवाच्या सृजनरंग रंगमंचावर श ृंगार रसाची अक्षरश: उधळण झाली. 

 

औरंगाबाद- महाराष्ट्राची आण-बाण-शान असलेल्या लावणी या नृत्यप्रकाराला दरवर्षीप्रमाणे यंदाही तोबा गर्दी झाली. वाढती गर्दी अन् प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून स्पर्धकही आणखी जोरकस सादरीकरण करत होते. पोलिसही या ठिकाणी सतर्क झाले होते. ग्रामीण आणि शहरी संघांतील विद्यार्थिनींनी देखणी वेशभूषा आणि सुरेख अदाकारी करत तरुणाईला खिळवून ठेवले. प्रत्येक सादरीकरणावर होणारा जल्लोष वातावरणाला बहर आणणारा होता. प्रेक्षकांतील तरुणांइतकाच जल्लोष तरुणीही करत होत्या.  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सादरीकरणाला मिळणारा दमदार प्रतिसाद कलावंतांचे धैर्य वाढवणारा हाेता. यासोबतच स्पर्धेपेक्षा प्रत्येक जण सादरीकरणाचा आनंद लुटत होता. टेप रेकॉर्डवर  गाणी लावण्यापेक्षा लाइव्ह गाण्यांवर ठेका धरला जात होता.  ग्रामीण समजल्या जाणाऱ्या या कलाप्रकाराला शहरी तरुणाईनेही आपलेसे केले आहे. त्यावर त्यांचा होणारा जल्लोष लावणीची लोकप्रियता सांगणारा होता. पाश्चात्त्य संगीताचा ज्वर असलेल्या तरुणाईचे हे रूप पाहून लोककलाप्रकार कधी लुप्त होऊ शकत नाही याची प्रचिती आली.  


नटले तुमच्यासाठी दिलबरा….राजसा…. या लावणीवर मिलिंद महाविद्यालयाची रोशनी इंगोले,  मिलिंद सायन्सची जया राऊत, वसंतराव नाईकची हेमलता धामुने यांनी दमदार सादरीकरण केले.  ‘नाकी डोळी  छान रंग गोरा गोरा...कुणी तरी या हो मला फिरवायला’ या एमपी लॉ महाविद्यालयाच्या वृषाली धोंगडेच्या सादरीकरणानेही दाद मिळवली. हायटेक मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय (वाळूज)च्या  विद्या मिसाळ हिने ‘नटरंग’तून लोकप्रिय झालेल्या ‘वाजले की बारा’वर ताल धरला.   यश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या पूजा धोंडगे हिने  ‘असं वाजवा की रात गाजवा की…’ या लावणीवर ताल धरला.   ७० संघांनी यात सहभाग नोंदववला. प्रा. व्ही. एस. जाधव, प्रा. सुरेश मुंढे, नितीन कडू आणि कैलाश टापरे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.     

 

बातम्या आणखी आहेत...