आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हयातीचा दाखला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा असल्याने बँकिग हॉल निवृत्त वेतनधारकांनी व्यापला होता. प्रत्येक पेन्शनरसाठी हा महिना महत्त्वाचा असतो. कारण हयातीचा दाखला त्यांना सादर करणे अनिवार्य असते, अन्यथा पुढे पेन्शन मिळण्यास अडचणी येऊ शकतात. गर्दीतून मार्ग काढत एक वृद्ध पेन्शनर खिडकीपाशी आले. मी व माझा एक सहकारी रमेश असे दोघे तेथे काम पाहत होतो. प्रचंड गर्दीमुळे अनवधानाने त्या ज्येष्ठ व्यक्तीकडे आमचे दुर्लक्ष झाले. त्यांचा गैरसमज झाला. काकांनी शांतपणे एक कोरा कागद मागितला. त्यावर घडलेला प्रसंग लिहून शाखा व्यवस्थापकांना तक्रारवजा पत्र दिले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून व्यवस्थापकांनी आम्हाला बोलावून घेतले. तिथेच निवाडा केला. आम्ही काकांची रीतसर माफी मागितली. त्यांची सर्व कामे अग्रक्रमाने करून त्यांना भविष्यात उत्तम सेवेची ग्वाही दिली. मने मोकळी झाली. जाता जाता काकांनी, ‘हा प्रसंग अलाहिदा, परंतु तू खूपच एफिशियंट आहेस’ असे म्हणत रमेशची मोठ्या मनाने स्तुती केली. त्यावर त्याची प्रतिक्रिया मिश्किल होती, ‘आय अ‍ॅम नॉट एफिशियंट, आय अ‍ॅम ओन्ली सफिशियंट.’ यावरून काकांच्या दिलखुलास स्वभावाची प्रचिती आली. बघता बघता आता लाइफ सर्टिफिकेट देण्याची वेळ माझ्यावरच येऊन ठेपली आहे. बँक कर्मचार्‍यांची रोडावत चाललेली संख्या, कामाचा फुगवटा, वाढते ग्राहक आणि सातत्याने उघडणारी त्यांची विविध खाती, अशा परिस्थितीत आजवर ज्येष्ठ ग्राहकवर्गांचे हित जपण्याचा प्रयत्न झालेला आहे. ग्राहक आणि बँक कर्मचार्‍यांच्या नात्यामधील परस्पारिक ओलावा असाच टिकून राहिला तर त्यांच्यासाठी बँकिंग व्यवहार आनंददायी अनुभव ठरेल. इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. आता पुन्हा तो प्रवाह आला आहे. बँकिंग क्षेत्रात सध्याच्या परिस्थितीत खासगी बँकांमुळे स्पर्धा वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांना ज्याप्रमाणे सुविधा मिळतात, तशाच सेवा इतर ग्राहकांनाही देण्यात सरकारी बँकांनी अग्रेसर राहिलेच पाहिजे.