आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील अतिदुर्मिळ सिझेरियन प्रसूती नाशिकमध्ये यशस्वी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केवळ तीन फूट ६ इंच उंची असलेल्या महिलेची सिझेरियन पद्धतीने प्रसुूती नाशिकमध्ये यशस्वी करण्यात अाली अाहे. देशातील ही एका हाताच्या बाेटावर माेजता येणारे तर महाराष्ट्रातील या प्रकारचे हे पहिलेच सिझेरियन असून अतिदुर्मिळ प्रकारात त्याचा समावेश हाेताे. विशेष म्हणजे, ही महिला अाणि तिचे बाळ दाेघेही सुखरूप असून अार्इ बनणे अशक्य असल्याने सराेगसी मदरचा पर्याय तिला काही डाॅक्टरांनी सुचविला हाेता. मात्र, नाशिकच्या डाॅ. हिमांगिनी चाैधरी यांचा अात्मविश्वास अाणि यशस्वी उपचारांमुळेच या महिलेला मातृत्वाचा अानंद मिळाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 


विद्या दीपक भंगाळे असे या मातेचे नाव अाहे. अाज २९ वर्षे वय असलेल्या विद्या यांना हाडांची अपूर्ण वाढ झाल्याने अॅकोन्ड्रो प्लाझिया हा आजार लहानपणीच झाला. 'एफजीएफअार-३' या गुणसूत्रातील बदलामुळे हा आजार होतो. या अाजारामुळे विद्याची उंची अवघी ३ फूट ६ इंच (१०९ से.मी.) इतकीच राहिली. अशा रुग्णांचे प्रमाण १५०००-४०००० मध्ये एक असे असते. पाठीचा कणा अनियमित वाकणे, तसेच जबड्याचे पुढे येणे असे बदल या रुग्णांमध्ये दिसतात. २०१६ मध्ये विद्याचा विवाह भुसावळच्या दीपक भंगाळे यांच्याशी झाला. एक वर्षानंतर अपत्यप्राप्तीसाठी सल्ला घेतला. परंतु उंचीमुळे तिला गर्भ राहणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे आहे, असे सांगण्यात आले हाेते. 


डाॅ. हिमांगिनी यांच्यामुळे दुर्दम्य इच्छाशक्ती 
हताश झालेली विद्या व तिचे आई-वडील विजया अाणि वामन वायकोळे हे डॉ. हिमांगिनी चौधरी यांच्याकडे आले. सर्व तपासण्या बघून आपण ही जोखमीची गर्भावस्था व प्रसूती करू शकतो, असे सांगितले. हे एक अाव्हानच हाेते. त्यांच्या उपचारानंतर विद्याला दाेन महिन्यांत दिवस गेले. पुढील तपासणी करून डॉ. हिमांगिनी यांच्याकडे पूर्ण नऊ महिने उपचार सुरू राहिले. योग्य उपचार, काळजी व रुग्णाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे ३४ अाठवड्यांपर्यंत गर्भाची व्यवस्थित वाढ झाली. नैसर्गिक प्रसूती शक्य नसल्याने व अधिक ताण विद्या सोसू शकणार नसल्याने सिझेरियन करावे लागले. सामान्य रुग्णांप्रमाणे रक्तस्त्राव विद्याला सोसणारा नव्हता. त्यामुळे योग्य ती सर्व काळजी घेत अतिजोखमीची सिझेरियन डॉ. हिमांगिनी चौधरी यांनी पार पाडली. पाठीच्या कण्याच्या अनियमित वाकमुळे तिला भूल देणे हे एक आव्हानच होते. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. नितीन वाघचौरे यांनी काम पाहिले. यामुळे विद्या व दीपक यांना आईवडील होण्याचा अशक्य असा आनंद प्राप्त होऊ शकला. 


देशात अशी केवळ तीन-चार प्रकरणे 
विद्या सारख्या अशा रुग्णांमध्ये कमी उंचीमुळे गर्भ राहिल्यास पोटातील इतर अवयवांवर त्याचा अतिरिक्त ताण पडतो. याचबराेबर फुप्फुसांवर अतिरिक्त ताण पडून जीवाला धोकाही संभवतो. अशा प्रकारच्या महिलेला गर्भ राहिला तरी आपोआप गर्भपात होणे, अति लवकर प्रसूती होण्यामुळे यशस्वी गर्भावस्था वा प्रसूतीचे प्रमाण नगण्य आहे. अशा केसेस फार थोड्या आहेत. भारतातील अाराेग्य शास्त्रांच्या पुस्तकांत नमूद केसेसपैकी ११२ सेंमी व १०८ सेंमी अशा तीन ते चार केसेस आहेत. 

बातम्या आणखी आहेत...