आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीजी’ कोर्सेसची सीईटी रद्द; Dr.BAMU विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उस्मानाबाद उपकेंद्र आणि संलग्नित महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवीच्या (पीजी) कोर्सेससाठी यापुढे कधीही सीईटी अर्थात प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार नाही. यावर्षी घेतली गेली, पण रिक्त जागांसाठी सीईटीशिवाय प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मूल्यांकनासाठी एक परीक्षा घेतली जात असताना पुन्हा प्रवेशासाठी परीक्षेची गरजच नाही, असे स्पष्ट मत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. 


१६ जुलैला डॉ. येवले यांनी कुलगुरू पदाचा कार्यभार घेतला. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या कार्यकाळातील पहिली व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. यात त्यांनी अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. यापूर्वी सीईटी घेतली गेली आहे, राज्य शासनाने आणि यूजीसीने निर्देश दिले म्हणून सीईटी घेण्यात आली होती, असे तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले होते, याकडे डॉ. येवले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘राज्य सरकार किंवा यूजीसीने असे काहीच म्हटलेले नाही. राज्य सरकारने सीईटी सेलमार्फत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांविषयी सरकारने असे काहीच म्हटलेले नाही. यूजीसीनेही कधीही असे नियम केलेले नाही. कमीत कमी परीक्षा अन् जास्तीत जास्त मूल्यमापन असेच यूजीसीचे धोरण आहे. विद्यापीठातर्फे पदवीस्तरावर परीक्षा घेतली जाते. त्याचे मूल्यमापन केले जाते. त्यानंतर त्याच विद्यार्थ्याला जर आता पीजीसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर पुन्हा प्रवेशपूर्व परीक्षेचा ताण का म्हणून द्यायचा..? असा सवाल कुलगुरूंनी उपस्थित केला आहे. पदवीस्तरावर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या अधारेही प्रवेश देता येऊ शकतील..?  त्यासाठी शैक्षणिक विभागप्रमुखांनी यापुढे गुणाक्रमानुसार यादी प्रसिद्ध करूनच प्रवेश द्यायच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.  दरम्यान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि संगणकशास्त्र आदी अभ्यासक्रमांसाठी तर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असते, तिथेही प्रवेशपूर्व परीक्षा होणार नाही का..? असा सवाल ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने विचारला तर अशा विषयांनाही गरज नाहीये. फक्त पत्रकारितेच्या कोर्सेससाठी यूजीसीने प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचे सांगितले आहे. तिथे मात्र पीजी-सीईटी घेतली जाईल. पीजी-सीईटी न घेण्याचा निर्णय उस्मानाबाद उपकेंद्रातील सर्व अभ्यासक्रम आणि संलग्नित महाविद्यालयांच्या पीजी कोर्सेसलाही होणार नाही, असे डॉ. येवले यांनी सांगितले.

 

> ५६ शैक्षणिक विभाग
> ४४७ संलग्नित महाविद्यालये
> १२६ पीजी कोर्सेस

 

> प्र. : सीईटी बंद करण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटते?
उ. : येथील विद्यापीठांना राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायची आहे, असे नेहमी कुलगुरूंद्वारे बोलले जाते. मग आपण जर गुणवत्तेच्या जोपासणेसाठी सीईटी घेणार नाही. थेट प्रवेश देणार असू तर स्पर्धेत कसे उतरायचे? 


> प्र. : आधीच्या कुलगुरूंनीच सीईटी सुरू केली होती ना?
उ. : होय, होय. मला तेच म्हणायचे आहे. आधीच्या कुलगुरूंनी काही तरी विचार करूनच सीईटी घेण्याचा निर्णय घेतला असेल.


> प्र. : या निर्णयाचे परिणाम?
उ. : मला वाटते ढासळत चाललेला दर्जा अन् वाढत्या बेरोजगारीमुळे पीजी कोर्सेसची गुणवत्ता राखण्याचे आपल्यापुढील आव्हान आहे. तरीही आपण ‘सीईटी’ रद्द करत आहोत, हे अनाकलनीय आहे.

 

मग राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा कशी करणार?
उच्च शिक्षणातील अभ्यासक्रम आणि त्यातील बदलांचे अभ्यासक, निवृत्त प्राचार्य प्रा. डाॅ. शरद अदवंत यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संपर्क साधला. तेव्हा सीईटी रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले की, मग आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले विद्यार्थी स्पर्धा कशी करणार? त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे थोडक्यात अशी.

बातम्या आणखी आहेत...