आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चला हवा येऊ द्या' शेलिब्रिटी पॅटर्न’च्या फिनालेला आले विदेशी पाहुणे, थुकरटवाडीत होणार हास्याचा कल्लोळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. या कार्यक्रमाचं शेलिब्रेटी पॅटर्न हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि यातील प्रेक्षकांच्या लाडक्या सेलिब्रिटीजनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या शेलिब्रेटी पॅटर्न पर्वाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळवत राहुल मगदूम, उमेश जगताप, अद्वैत दादरकर, अभिज्ञा भावे, शर्मिला राजाराम आणि राज हंचनाळे हे सहा कलाकार शेलिब्रिटी पॅटर्नच्या फिनालेला पोहोचले.

चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्नचा फिनाले पाहण्यासाठी झी मराठीवरील सर्व लाडक्या मालिकांचे कलाकार तर उपस्थित होतेच पण या फिनालेमध्ये फायनॅलिस्ट्सचे परफॉर्मन्सेस एन्जॉय करण्यासाठी काही विदेशी पाहुणे देखील आले. जपान, अमेरिका, अरब आणि आफ्रिका मधून काही पाहुणे थुकरट वाडीत सज्ज झाले. हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून 'चला हवा येऊ द्या'चे विनोदवीर आहेत जे एका भन्नाट स्किटने प्रेक्षकांना लोटपोट करतील.

अमेरिकेहून डोनाल्ड तात्या ट्रम्प म्हणजेच भाऊ कदम, जपानहून भुई मुगाची म्हणजे श्रेया बुगडे, अरब वरून कुशल बद्रिके आणि आफ्रिकेवरून सागर कारंडे असे हे पाहुणे फिनाले पाहण्यासाठी सज्ज होतील. त्यांच्या सोबत पाहुणे म्हणून मृण्मयी देशपांडे, रवी जाधव, संजय जाधव आणि झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांचे सर्व कलाकार थुकरट वाडीत उपस्थित असणार आहेत. कुठला कलाकार शेलिब्रिटी पॅटर्नचं विजेतेपद पटकवणार हे प्रेक्षकांना रविवार 8 मार्च संध्यकाळी 7 वाजता प्रसारित होणाऱ्या चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्नच्या फिनालेमध्ये कळेल.