हॉट सीट / सलग ३ निवडणुका जिंकणाऱ्या प्रदीप नाईकांची या वेळी सत्त्वपरीक्षा

नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदिवासीबहुल मतदारसंघ

दिव्य मराठी

Sep 23,2019 05:07:00 PM IST

विनायक एकबोटे

नांदेड - राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला किनवट हा एकमात्र मतदार संघ. गेल्या तीन निवडणुकांत राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक यांनी सलग विजय मिळवला. या वेळी मात्र त्यांना विजयासाठी बरेेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. एकमेव आदिवासी बहुल असलेला किनवट मतदार संघ यावेळी कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विदर्भ व तेलंगणाच्या सीमेवरील किनवट मतदार संघ एकेकाळी राज्यात गाजला. सध्या वंचित बहुजन आघाडीमुळे चर्चेत असलेले अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाचा पहिला प्रयोग किनवटमध्येच केला. दलित आदिवासींची मोट बांधून आंबेडकरांनी भीमराव केरामांना थेट विधान सभेत पोहोचवले. त्यामुळे हा मतदार संघ चर्चेत आला. नंतर मात्र या मतदार संघाने फारसे लक्ष वेधले नाही. प्रदीप नाईक यांनी तीन वेळा भीमराव केराम यांचा पराभव केला. मतविभाजनाचा फायदा व बंजारा समाजाची गठ्ठा मते यावर प्रदीप नाईकांनी विधान सभेच्या निवडणुका जिंकल्या. परंतु आता परिस्थिती बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात गळती लागली अाहे. भाजप चर्चेत अाहे. तर लोकसभा निवडणुकीत किनवट मतदार संघातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना ४४ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे सेनाही जोरात आहे. भीमराव केरामांना भाजपची उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.


सर्वाधिक वन परिक्षेत्राचा मतदार संघ
मराठवाड्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला हा मतदारसंघ आहे. येथे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात असली तरी त्या मानाने भागाचा विकास झालेला नाही.

हे असू शकतात संभाव्य उमेदवार
राष्ट्रवादीकडून प्रदीप नाईकांची उमेदवारी निश्चित मानली जाते. कॉंग्रेस कडून राजेंद्र केशवे, किशन राठोड आणि माधवराव मरस्कोले, भाजपतर्फे अशोक सूर्यवंशी, रमण जायभाये, सुमित राठोड, संध्या राठोड, धरमसिंग राठोड आणि यादव जाधव तर शिवसेनेकडून सचिन नाईक, ज्योतिबा खराटे तर वंचित कडून - हेमराज उईके, मोहन राठोड व किशन मिरासे इच्छुक.

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
प्रदीप नाईक : राष्ट्रवादी ६०,१२७
भीमराव केराम : अपक्ष ५५,१५२
अशोक सूर्यवंशी : भाजप १८,६९५
बी. डी. चव्हाण : शिवसेना १८,२२७

या आहेत मतदारसंघातील समस्या
जिल्हा मुख्यालयापासून लांब असल्याने स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीनेही हा भाग दुर्लक्षित राहिला. जंगलांचीही अपरिमित हानी झाली. किनवटला उपजिल्हा रुग्णालय असले तरी अत्यवस्थ रुग्णांना यवतमाळ किंवा आदिलाबादला हलवावे लागते. माहूरला निवासाच्या व्यवस्था नाहीत. लालूप्रसाद यादव यांनी माहूर-किनवट या रेल्वे मार्गाला मान्यता दिली. परंतु तो कागदावरच आहे. या भागाचे औद्योगिक मागासलेपण कायमच आहे.

X
COMMENT