आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश : मराठा आरक्षण अध्यादेशाला नागपूर खंडपीठात आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून सोमवारी न्यायालयाने राज्याचे महाअधिवक्ता, राज्य सरकार आणि सीईटी सेलला नोटीस बजावत १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.


वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना याच वर्षी मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून हा वाद सुरु आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आल्याने ते यावर्षी लागू करण्यात येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयातही त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांमध्ये १६ टक्के आरक्षण कायम ठेवले. त्या अध्यादेशाला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अलिकडेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार देत विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अध्यादेशाला आव्हान दिले आहे. 


राज्य सरकारचा अध्यादेश अवैध असून तो रद्द करण्यात यावा आणि याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत प्रवेश प्रक्रिया व आरक्षण स्थगित ठेवण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. सोमवारी याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता, राज्य सरकार आणि सीईटी सेलला नोटीस बजावली असून १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...