एखाद्या व्यक्तीची पारख करताना त्याची त्याग भावना पाहावी आणि या गोष्टींकडेही लक्ष द्यावे

चाणक्य नीतींचे पालन केल्यास दूर राहू शकता विविध अडचणींपासून

रिलिजन डेस्क

Mar 20,2020 04:32:53 PM IST

आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्राची रचना केली होती. या ग्रंथामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनासाठी विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीतींचे पालन केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, एखाद्यावर विश्वास ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास भविष्यातील नुकसानापासून दूर राहणे शक्य आहे.


चाणक्य नीती...

यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते निघर्षणं छेदनतापताडनै:।

तथा चतुर्भि: पुरुषं परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।


या श्लोकामध्ये आचार्य चाणक्य सांगतात की, सोन्याची पारख करण्यासाठी चार गोष्टी करणे आवश्यक आहेत. सोन्याला रगडून, कापून आगीमध्ये गरम करून आणि दाबून पाहिले पाहिजे. या चार गोष्टी केल्यानंतरच शुद्ध सोन्याची पारख केली जाऊ शकते. जर सोन्यामध्ये भेसळ किंवा कमतरता असेल तर या कामांमुळे ती समोर येईल.


पहिली गोष्ट - त्यागाची भावना पहावी

कोणत्या व्यक्तीला पारखण्यासाठी सर्वात पहिले त्यांची त्याग क्षमता पाहावी. जर एखादा व्यक्ती इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करत असेल तर निश्चितच तो श्रेष्ठ व्यक्ती असतो. ज्या लोकांच्या मनामध्ये त्यागाची भावना नसते ते कधीही श्रेष्ठ व्यक्ती बनू शकत नाहीत. त्यागाच्या भावनेशिवाय व्यक्ती कोणाचेही भले करू शकत नाही.

दुसरी गोष्ट - चारित्र्य पाहावे

व्यक्तीला पारखण्याच्या प्रक्रियेत दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे चारित्र्य पाहावे. ज्या लोकांचे चारित्र्य स्वच्छ असते म्हणजे वाईट गोष्टींपासून दूर राहणारे आणि इतरांबद्दल मनात वाईट विचार ठेवत नाहीत असे लोक श्रेष्ठ असतात. जर एखाद्या व्यक्तीचे चरित्र दुषित आणि विचार पवित्र नसतील तर अशा व्यक्तीपासून नेहमी दूर राहवे.


तिसरी गोष्ट - गुण पाहावेत

पारखण्याच्या प्रक्रियेत तिसरी गोष्ट म्हणजे व्यक्तीचे गुण पाहावेत. सामान्यतः प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले आणि काही वाईट गुण असतात. परंतु ज्या लोकांमध्ये अवगुण जास्त असतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. अवगुण म्हणजे नेहमी राग-राग करणे, वारंवार खोटे बोलणे, इतरांचा अपमान करणे, अहंकारात उन्मत राहणे. ज्या लोकांमध्ये असे अवगुण असतात ते कधीही श्रेष्ठ व्यक्ती मानले जात नाहीत.


चौथी गोष्ट - कर्म पाहावेत

शेवटची गोष्ट म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या कर्माचेसुद्धा अवलोकन करावे. जर एखादा व्यक्ती चुकीच्या पद्धतीने पैसा कमवत असेल किंवा अधार्मिक काम करत असेल तर अशा लोकांपासून दूर राहावे. चुकीचे काम करणारा मनुष्य आपल्या जवळपास राहणाऱ्या लोकांवरही वाईट प्रभाव टाकतो. तसेच अशा लोकांच्या मैत्रीमुळे आपण संकटात सापडू शकतो.

X