आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज वाढवण्यासाठी बँका एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची शक्यता 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बचत ठेव योजना म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) वरील व्याजदरात वाढ होणार आहे. वास्तविक बँकांवर कर्जात वाढ करण्याचा दबाव आहे. मात्र, जास्त कर्ज देण्यासाठी बँकांनाही जास्त रकमेची आवश्यकता आहे. बँकांना मार्च २०२० पर्यंत २५ लाख कोटी रुपयांची गरज पडेल, असा अंदाज मानांकन संस्था क्रिसिलने व्यक्त केला आहे. 

 

यामधील १९ ते २० लाख कोटी रुपये बँकेतील जमा रकमेतून मिळवावे लागणार आहेत. त्यामुळे लोकांना दीर्घ मुदतीमध्ये बचत ठेव जमा करण्याकडे आकर्षित करण्यासाठी व्याजदरात वाढ करावी लागणार आहे. व्याजदरात किती वाढ होईल, याचा अंदाज क्रिसिलने व्यक्त केलेला नसला तरी इतर तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यामध्ये ०.५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

क्रिसिलनुसार बँकांना उर्वरित ५ ते ६ लाख कोटी रुपये एसएलआर कमी झाल्याने मिळतील. बँकांना एकूण जमा रकमेमधील एक वाटा सरकारी बाँड आणि सोन्यामध्ये गुंतवावा लागतो, त्याला एसएलआर असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२० पर्यंत हा १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या हा १९.२५ टक्के आहे. 

 

संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार एफडीवरील व्याजदरात कपात करण्यात आल्याने मागील काही वर्षांत लोकांमध्ये याप्रती असलेले आकर्षण कमी झाले आहे. इतर आर्थिक श्रेणीच्या तुलनेमध्ये एफडीमध्ये कमी वाढ दिसून येत आहे. एसएलआरसंदर्भात क्रिसिलनुसार बँकांनी सध्या १९.५ टक्क्यांच्या निर्धारित मर्यादेपेक्षा आठ टक्के जास्त रक्कम यामध्ये गुंतवणूक करून ठेवलेली आहे. बँका यात कपात करून चार टक्क्यांपर्यंत ही रक्कम कमी करू शकतात. 

 

क्रिसिलचे वरिष्ठ संचालक कृष्णन सीतारमण यांनी सांगितले की, जमा वाढल्याने क्रेडिट-डिपॉझिट यांच्या गुणोत्तरात सुधारणा होईल. २०१७-१८ मध्ये हे गुणोत्तर ७३ टक्के होते, जे २०१८-१९ च्या अखेरपर्यंत ७८ टक्के अाणि २०२० पर्यंत ८० टक्के होऊ शकते.

 

खासगी बँका देताहेत ०.५ टक्क्यांपर्यंत जास्त व्याज 
तिप्पट जास्त जमा रकमेची गरज 

अहवालानुसार अलीकडच्या वर्षांमध्ये बँकांत सरासरी सात लाख कोटी रुपये जमा होत होते. म्हणजेच बँकांना या वर्षी तिप्पट जास्त रक्कम जमा हाेण्याची गरज असेल. त्यासाठी बँकांना एफडीवरील व्याजदरात वाढ करावी लागेल. 

 

नव्या जमा रकमेतील ६० % वाटा खासगी बँकांना 
जमा रक्कम वाढवण्याच्या स्पर्धेत खासगी बँका पुढे राहतील. ५५ टक्के ते ६० टक्के वाटा त्यांनाच मिळणार आहे. सध्या एकूण जमा रकमेमधील ३० टक्के वाटा खासगी बँकांमध्ये आहे. मागील पाच वर्षांत खासगी बँकांच्या जमा रकमेत सात टक्क्यांच्या दराने वाढ झाली आहे. 

 

शेअर बाजार अस्थिर, त्यामुळे एफडीत वाढ 
अहवालानुसार शेअर बाजारातील चढ-उतार पाहता लोक घरगुती बचत बँकेच्या एफडीमध्ये गुंतवण्याची जास्त शक्यता आहे. मागील काही महिन्यांत जमा रकमेवरील व्याजदर ०.४० टक्के ते ०.६० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...