आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाने लिहिलेल्या खासदार खैरेंच्या चरित्रात एकही लोकोपयोगी काम नाही, देवदर्शनाचेच फोटो सर्वाधिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे चरित्र आगामी लोकसभेच्या प्रचारासाठी प्रसिद्ध केले आहे. त्यांचे जावई डॉ.संजय सुर्वे यांनी हे पुस्तक तयार केले आहे. पण तब्बल ३० वर्षांत त्यांच्या सासऱ्यांनी मतदारसंघात कोणती लोकोपयोगी कामे केली, याचा लेखाजोखा कुठेही नाही. हे पुस्तक म्हणजे खासदार खैरे यांची मतदारसंघातील फोटोजनिक चमकोगिरी ठरली असून संतमहंत आणि देवदर्शनाच्या फोटोंचा भडिमार आहे. 


“साहेबांचा शिवसैनिक एक प्रवास’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे पुस्तक काढले असले तरी त्यात दिल्लीहून मंजूर करून आणलेल्या विकासकामांचा ताळेबंद कुठेही दिसत नाही. गेल्या ३० वर्षांत नेमकी कोणती विकासकामे केली याचा आलेख नाही की विकास निधी निदान गेल्या पाच वर्षंात कुठे खर्च केला ते दिसत नाही. तो निधी खैरे यांनी मतदारसंघात खर्च केला असेल तर या पुस्तकात त्याचा साधा उल्लेखही नाही. गेली तीन  दशके ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यात विकासकामांचा वाटा किती हेही जनतेला या चरित्रातून पटवून देता आलेले नाही.


खैरे यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. वैयक्तिक भेटीगाठी, धार्मिक सोहळे, मतदारसंघातील भटकंती, दिग्गज नेत्यांच्या भेटीचे फोटो, तेही मछली खडक ते दिल्लीपर्यंतचे. पण मतदारांसाठी नेमकी ठळक कामे कोणती केली याचा काहीही उल्लेख नाही. औरंगाबादसह खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, वैजापूर या तालुक्यांत केलेल्या विकासकामांचा साधा उल्लेखही नाही.


देवभोळा खासदार अशीच प्रतिमा; चरित्रात ९९% फोटो...
जॅक प्रिंटर्स मुंबई या ठिकाणाहून गुळगुळीत फॉरेन पेपरवर हे महागडे चरित्र छापून आणले आहे. खैरे आता फक्त शिवसैनिक नाहीत तर साहेब कसे झाले आहेत याचीच प्रचिती हे चरित्र न्याहाळताना येते. ते दुसऱ्या टर्मची निवडणूक लढवत आहेत अशीच या चरित्राची मांडणी आहे. या पुस्तकात त्यांचा प्रत्येक ठिकाणी साहेब असाच उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे चरित्र हिमालयाइतके उत्तुंग असल्याचाही उल्लेख आहे. जिल्ह्यात जनतेसाठी कोणती कामे केली हे सांगता आलेले नाही. देवभोळा खासदार अशीच प्रतिमा या चरित्रात पानोपानी केली आहे. हे जनतेसाठी काढलेले प्रचार चरित्र नव्हे तर वैयक्तिक फोटोबायोग्राफी ठरत आहे. 


समांतर, रस्ते, कचरा प्रश्न याचा उल्लेखही नाही...
या चरित्रात लेखकाचे मनोगत, प्रचारसभांचे फोटो, कौटुंबिक पार्श्वभूमी, शिवसेनेचा इतिहास, मनपा आणि शहर, विधानसभेची पहिली निवडणूक, अशांत औरंगाबाद, लोकसभेच्या निवडणुका कशा जिंकल्या, सलग चौथ्यांदा खासदार, मतदारसंघाच्या विकासासाठी, वैयक्तिक दिनचर्या, सामाजिक जाणीव, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ, दिल्लीतील निवासस्थान अशा पंधरा प्रकरणांत अडीचशे पानी चरित्र विभागले आहे. यात विमानतळाचे विस्तारीकरण वगळता एकही मोठे ठळक काम मांडता आलेले नाही. दोन वेळा आमदार (१९९० ते १९९५ व १९९५ ते १९९९), त्यात एकदा राज्यात मंत्रिपद. नंतर सलग चार वेळा खासदार (१९९९,२००४,२००९ व २०१४ लोकसभा निवडणूक) असा ३० ‌वर्षांचा राजकीय प्रवास आहे. यात औरंगाबाद शहरातील समांतर जलवाहिनीचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार? शहरातील रस्ते आणि कचऱ्याचा गंभीर प्रश्न कसा सोडवणार? त्यासाठी काय काम केले? याचा कुठेही उल्लेख नाही.

बातम्या आणखी आहेत...