आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जत वेगळीच...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत नेरकर

दिवाळीच्या फराळाचं सामान वाण्याकडून आणून देणं इतकंच काय ते नवरोबाचं फराळात योगदान. मात्र, हे चित्र सार्वत्रिक नाही बरं का? बायकोनं केलेला फराळ मिटक्या मारत खाण्याऐवजी, फराळ बनवण्याच्या प्रवासाची मजा बायकोच्या बरोबरीनं घेणाऱ्या एका नवरोबाचा हा चविष्ट अनुभव...
 

दिवाळीमध्ये एकमेकांकडच्या फराळाचा आस्वाद घेण्याची काही मजा औरच असते. दिवाळी जवळ आली की गल्ली-बोळात फराळाची दुकानं किंवा फराळ विक्रीचे स्टॉल दिसतात. पण फराळ हा नेहमी घरीच बनावा यासाठी मी आग्रही असतो. दिवाळीच्या काही दिवस आधी आम्ही किराणा सामान खरेदी करून दोघे मिळून फराळ बनवतो. तसा विचार केला तर फराळामध्ये शेव बनवणे हे अगदी सोप्पं काम आहे असं समजून मी शेव करायला घेतली, तर ती बारीक शेव पडण्याऐवजी गारांचे गोळे पडावे तसे शेवीने रौद्ररूप घेतले. हा असा बिघाड झाला तर शेवेचे वडे तळण्याखेरीज दुसरा पर्याय नाही उरला. नंतर नंबर लागला तो चकलीचा. चकली म्हणजे घरात सर्वांना अतिशय प्रिय पदार्थ. म्हणून अतिशय बारकाईने चकलीचे पीठ तयार करून चकल्या तळल्या. तळून खाली ठेवतो तर काय त्याचे तुकडेच पडू लागले. यावर आमची सुगरण बायको काय काय उपाय करून एक यशस्वी घाणा काढते. लगेच फराळ झाला तर चव बघण्याची सर्वांना घाई असते. मग मीठ कमी, तीळ विसरली असा सगळा गोंधळ सुरू होतो. पुढचा नंबर रवा लाडूचा. लाडू करताना सर्वात जास्त टेन्शन असते. तूप, पाक एकदम मापात करण्याच्या घाईत वेगळचं माप तयार होतं. कधी-कधी वाळूसारखे होतात तर कधी एकदम मऊच होतात. कधी दगडाच्या गोळ्यासारखे होतात. अशा या फराळाच्या आठवणी वर्षभर आठवणीत राहतात. दरवर्षी फराळ करताना काय झालं होतं याचा आम्ही विचार करतोच. तशीच बेसन लाडूचीही मजा काही औरच असते. लाडू वळून ताटात ठेवतो. नंतर काही वेळात बघतो तर काय, भाऊबंदकी असल्यासारखे सगळे लाडू एकमेकांमध्ये मिसळून जातात. मग आम्ही दोघे मिळून पुन्हा या लाडवांना आकार देतो. या अशा दरवर्षी प्रत्येक फराळाच्या आमच्या कहाण्या आहेतच. हे ऐकून तुम्ही म्हणाल की जमत नाही तर का फराळ करायचा घाट घालता... पण खरे सांगू ? अशा या प्रसंगांमधून जेव्हा फराळ  तयार होतो तेव्हा त्याची लज्जत काही वेगळीच असते. 

लेखकाचा संपर्क- ९४२३४०७२४८