Home | Sports | Cricket | Off The Field | Chandrakant Pandit/Cricket

फॉलोऑननंतर मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये वाजत होते संगीत!

विनायक दळवी | Update - Jan 02, 2019, 08:48 AM IST

कुठे गेला मुंबईच्या क्रिकेटचा खडूसपणा? पंडित यांची कैफियत

  • Chandrakant Pandit/Cricket

    मुंबई- 'रोम जळत होते आणि रोमचा राजा निरो फिडल वाजवत होता'- आज क्रिकेटची देदीप्यमान परंपरा असणारा मुंबई संघ फॉलोऑन स्वीकारून डावाच्या पराभवाने हरत होता आणि मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये संगीत वाजत होते. मुंबईची ड्रेसिंग रूम 'शेअर' करणे हा क्रिकेटपटूंसाठी एक बहुमान होता, आज मात्र डावाच्या पराभवातही हा संघ आनंद मानत, संगीताचा आनंद लुटण्यात मश्गुल होता. ही प्रतिक्रिया आहे, एकेकाळी मुंबईचे प्रतिनिधित्व केलेल्या, प्रशिक्षण दिलेल्या चंद्रकांत पंडित यांची. मुंबईचा नागपूरच्या मैदानावरील पराभव चर्चेचा ठरला. चंद्रकांत पंडित यांनी गतवर्षी विदर्भाला पहिलेवहिले रणजी विजेतेपद पटकावून दिले. यंदा डावाच्या विजयाची गरज असलेला मुंबई संघ स्वत:च डावाने पराभूत झाला.

    पंडित म्हणत होते, खेळपट्टी अतिशय चांगली होती. तरीही विदर्भासारख्या संघासमोर मुंबईने अडीच दिवसांत नांगी टाकावी याचीच मुंबईचा माजी खेळाडू म्हणून मला लाज वाटली. मुंबईचे क्रिकेट किती उच्च दर्जाचे आहे, मुंबईचे खेळाडू किती खडूस असतात हे निवृत्तीनंतरही वासीम जाफरने १७८ धावांची खेळी करून दाखवून दिले. याउलट मुंबईचे तरुण खेळाडू किती पिचके आणि ठिसूळ आहेत हे विद्यमान संघाने दाखवून दिले, याची मला खंत वाटते.

    दोन वर्षांपूर्वी हाच मुंबईचा क्रिकेट संघ बलशाली वाटत होता, परंतु कुठे तरी माशी शिंकली. मुंबई क्रिकेट संघटनेवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफला देण्यात येणारे मानधन अधिक आहे, असे वाटायला लागले. शरद पवार, दिलीप वेंगसरकर यांनी सबुरीचा सल्ला देऊनही चंद्रकांत पंडित यांना व अन्य काहींना तडकाफडकी काढून टाकण्यात आले. खेळाडूंना पंडित नको आहेत, असे कारण पुढे करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, आज विदर्भाविरुद्ध डावाने हरल्यानंतर हेच मुंबईचे खेळाडू पंडितांकडे आले आणि म्हणायला लागले, 'सर, आम्ही तुम्हाला मिस करतोय.' यंदाच्या हंगामात रणजी क्रिकेटप्रमाणे मुंबईच्या १९ वर्षांखालील व २३ वर्षांखालील क्रिकेट संघांचीही वाताहत झाली आहे.

Trending