राजकीय / 'पंकजा मुंडे कालही भाजपात होत्या, आजही आहेत, उद्याही राहतील', चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून भाजपचा उल्लेख काढल्याने पक्ष बदलाच्या चर्चांना उधाण
 

Dec 02,2019 02:29:01 PM IST

मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी ट्विटरवर एक पोस्ट टाकत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. तर सोमवारी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच "पंकजा मुंडेंच काय तर भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत," असा खळबळजनक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. या सगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलाबाबत होणाऱ्या चर्चा अफवा असल्याचे ते म्हणाले.

पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलाबाबत चर्चांमध्ये तथ्य नाही


चंद्रकांत पाटील म्हणाले की, "पंकजा मुंडे भाजप सोडून इतर पक्षात जाण्याच्या बातम्या येत आहेत. अपघाती सरकार आल्यानतंर अशा कल्पना मांडणे सुरु झाले आहे. पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलाबाबत चर्चांमध्ये तथ्य नाही. पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्या पक्ष सोडणार नाहीत. पंकजांशी आमचे बोलणे झाले आहे. पंकजा मुंडे कालही भाजपात होत्या, आजही आहेत, उद्याही राहतील, त्यामुळे या अफवा थांबवाव्यात."

पंकजांनी केली होती फेसबुक पोस्ट

12 डिसेंबरला भाजप दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस आहे. त्याच दिवशी आपली पुढची वाटचाल जाहीर करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी फेसबूक पोस्टद्वारे म्हटले आहे. कार्यकर्त्यांना मला बोलायचं आहे आणि मलाही कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मात्र सध्या मला शांतता पाहिजे आहे. मला माझ्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवायचं आहे असं त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून म्हटलं. या सर्वामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून वेगळी वाट धरणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

X