आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी मुख्यमंत्री 'कायम'; दोन आजारी मंत्र्यांना 'डच्चू'; गोव्यात मंत्रिमंडळात फेरबदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी मंत्रिमंडळात किरकोळ फेरबदल केला. त्यांनी फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मडकईकर या भाजपच्या दोन आजारी मंत्र्यांना वगळून पक्षाचे आमदार नीलेश कॅब्राल आणि मिलिंद नाईक या दोन नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. 


राजभवनात पार पडलेल्या साध्या समारंभात राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी कॅब्राल आणि नाईक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते शपथविधी समारंभाला उपस्थित नव्हते. डिसुझा हे नगरविकासमंत्री, तर मडकईकर हे ऊर्जामंत्री होते. डिसुझा यांच्यावर सध्या अमेरिकेतील एका रुग्णालयात, तर ब्रेन स्ट्रोकनंतर मडकईकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


नाईक हे मॉर्मुगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी याआधी लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री म्हणून काम केले होते. कॅब्राल हे कुरचोरेम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते प्रथमच मंत्री झाले आहेत. 


पर्रीकर आजारी असल्याने ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कायम राहतील की नाही, याबद्दल साशंकता होती, पण पर्रीकर हेच यापुढेही मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारीच स्पष्ट केले होते. त्यामुळे तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला होता. त्यानंतर लगेचच हा फेरबदल करण्यात आला. तत्पूर्वी शहा यांनी भाजपचे नेते आणि इतर घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी तीन केंद्रीय नेत्यांना राज्यात पाठवले होते. 


२० वर्षांच्या पक्षनिष्ठेचे हेच फळ काय? : डिसुझा 
डिसुझा यांनी मंत्रिमंडळातून वगळण्याच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केले आहे. २० वर्षांपासून मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, त्याचे मला हेच फळ दिले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळातून वगळण्याआधी मला विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा दावा त्यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...