आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 किमी प्रतितास वेगाच्या 'राजधानी' एक्स्प्रेसमुळे चार गाड्यांच्या वेळेत बदल 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मध्य रेल्वेतून प्रथमच मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस शनिवारी (दि.१९) धावणार आहे. १३० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या या गाडीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून नियोजन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चार रेल्वेगाड्यांच्या नियोजित वेळेत बदल केला जाणार आहे. कुर्ला-लखनऊ एसी सुपरफास्ट, मुंबई-जबलपूर गरीब रथ (दोन्ही बाजूने) आणि जनसाधारण एक्स्प्रेस या गाड्यांच्या नियाेजित वेळेत बदल होणार आहे.

 

मध्य रेल्वेतून प्रथमच सुरू होणारी राजधानी एक्स्प्रेस मुंबई, नाशिक, भुसावळमार्गे धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून यापुर्वी या गाडीसाठी मुंबई ते इगतपुरीपर्यंत चाचणी घेण्यात आली होती. मुंबईतून सुटल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस नाशिक आणि भुसावळातच थांबणार आहे. जळगाव येथील थांब्याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनकडून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जळगावातील प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेस पकडण्यासाठी भुसावळात यावे लागेल. मुंबईतून भुसावळमार्गे राजधानी एक्स्प्रेस सुरू व्हावी, अशी दीर्घकाळापासून मागणी प्रलंबित होती. ही मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांना सुविधा मिळेल. 

 

मुंबईतून भुसावळमार्गे दिल्लीसाठी शनिवारपासून वातानुकूलित गाडी धावणार 
मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून प्रथमच राजधानी एक्स्प्रेस सुरू होत आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्या १०० ते ११० किमी वेगात धावतात. मात्र, राजधानी एक्स्प्रेस विभागातून १३० च्या वेगात धावणार आहे. त्यामुळे रेल्वेने दिल्लीसाठी लागणारा वेळ कमी वाचेल. या गाडीला ठरावीक स्थानकांवरच थांबा असेल. तसेच गाडीला पुढे व मागे असे दोन इंजिन असतील. त्यामुळे इंजीन बदलण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. 

 

या गाड्यांच्या वेळेत बदल 
(२२१२१) कुर्ला-लखनऊ एसी सुपरफास्ट दुपारी २.२० ऐवजी १.४० वाजता सुटेल. (१२१८७) जबलपूर-मुंबई गरीब रथ साेमवार, बुधवार आणि शनिवारी सुटते, ही गाडी आता साेमवार, बुधवार व शुक्रवारी सुटेल. (१२१८८) मुंबई जबलपूर गरीब रथ ही गाडी मंगळ, गुरूवार, रविवार ऐवजी आता मंगळवार, गुरूवार व शनिवारी निघेल. (१२५९८) मुंबई-गाेरखपूर जनसाधारण एक्स्प्रेस दुपारी २.२० ऐवजी १.२० वाजता सोडली जाणार आहे. 

 

दोन्ही खासदारांचा पाठपुरावा 
साेमवारी मुंबई ते भाेपाळदरम्यान होणारी राजधानी एक्स्प्रेसच्या वेगाची चाचणी तूर्त लांबली आहे. ही गाडी सुरू करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्याप्रमाणेच नाशिकचे खासदार हेमंत गाेडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली. ही गाडी सुरु झाल्यानंतर भुसावळ विभागातील प्रवाशांना सुविधा मिळेल. 

 

राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशांची अंमलबजावणी केली जात आहे. दर शनिवारी सुटणाऱ्या या वातानुकूलीत गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. -आर.के. यादव, डीआरएम, भुसावळ 

 

रेल्वेची १४० टक्के वाहतूक  
भुसावळ विभागातील रेल्वे रुळांवरून सध्या १४० टक्के वाहतूक होत आहे. त्यात राजधानी एक्स्प्रेसची भर पडणार आहे. ज्या रूळांवरून २४ तासांमध्ये १०० गाड्या जाणे अपेक्षित असते, त्या ट्रॅकवरून सध्या १४० रेल्वे गाड्या धावत आहेत. त्यामुळे भुसावळ ते नाशिकदरम्यान रेल्वे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. भुसावळ-जळगाव मार्गावर तिसरी आणि चाैथी रेल्वेलाइन सुरू झाल्यानंतर रेल्वे मार्गावरील भार काही प्रमाणात कमी होईल. 

 

भुसावळात बदलणार लोकोपायलट 
मुंबईतून सुटणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाडीवरील लोको पायलट व असिस्टंट लोकोपायलट इगतपुरीपर्यंत येतात. तेथून भुसावळ विभागाचे लोकोपायलट गाडी घेऊन भुसावळपर्यंत येतात. भुसावळातून भोपाळ येथील लोकोपायलट गाडी घेऊन पुढे मार्गस्थ होतात. मात्र, राजधानी एक्स्प्रेसला मुंबईतील लोकोपायलट थेट भुसावळपर्यंत आणतील. नंतर भुसावळातील लोकोपायलट भाेपाळपर्यंत गाडी नेतील. 

 

बातम्या आणखी आहेत...