आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार इम्तियाज जलील यांच्‍याबद्दल अपशब्द काढताच कार्यकर्त्यांनी खुर्चा भिरकावल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वक्फ मालमत्तांसंबंधी चर्चा करण्यासाठी शहरात आलेल्या केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाच्या समितीने आमदार इम्तियाज जलील यांना भर कार्यक्रमात तीन साल से आप सो रहे थे क्या? असे शब्द वापरुन अपमानित केल्यामुळे संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी माइक हिसकावून खुर्च्यांची फेकाफेक केली. समितीच्या सदस्यांना शिव्यांची लाखोली वाहत बैठक उधळून लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच इम्तियाज यांनी सदस्यांना कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर काढले आणि गाड्यांत बसवून त्यांना परत पाठवून दिले.


अंमलबजावणीमध्ये येत असलेल्या अडचणी आणि सुधारणा यासंबंधी अहवाल सादर करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती जकिउल्ला खान कमिटी गठित करण्यात आली आहे. कमिटीचे अध्यक्ष स्वत: खान आहेत. समितीचे सदस्य अॅड. सय्यद शाहिद हुसेन रिझवी, अॅड. टी. ओ. नौशाद, डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी वक्फ बोर्ड विश्वस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यासंबंधीचा अहवाल शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी बैठकीचे आयोजन होते. बैठक सुरू असताना आमदार इम्तियाज जलील तेथे आले. बोर्डाचे औरंगाबाद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तडवी यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना मंचावर बसवले. आमदार इम्तियाज यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देण्यात आली. यादरम्यान त्यांनी वक्फ बोर्ड आणि वक्फ मालमत्ता आणि विश्वस्तांच्या समस्या समितीसमोर मांडल्या. तसेच याविषयी असलेला कायदा आणि नियमांमध्ये काही सुधारणा सुचवल्या. त्यांचे भाषण सुरू असताना समितीचे सदस्य अॅड. सय्यद शाहिद हुसेन रिझवी यांनी तीन साल से आप क्या सो रहे थे क्या? असे अपमानित करणारे शब्द वापरले. त्यानंतर लगेच दुसरे सदस्य डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी हातात माइक घेत इम्तियाज यांना ओ हो...आप एमएलए है क्या? असे म्हणून हिणवले. हे एेकताच एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला आणि त्यांनी घोषणाबाजी करत सदस्यांच्या अंगावर धाव घेत खुर्च्यांची फेकाफेक केली. कार्यकर्त्यांनी सदस्यांना अक्षरश: पिटाळून लावले. दुपारी चार वाजेपर्यंत चालणारी बैठक तासाभरातच आटोपती घ्यावी लागली.

 

संरक्षणात बाहेर पाठवून दिले
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच इम्तियाज यांनी त्यांना संरक्षण देत सभागृहातून बाहेर काढून त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून पाठवून दिले. यादरम्यान सभागृहाला कार्यकर्त्यांनी घेराव घातला हाेता. पण आमदारांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...