आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरका, करपा रोगाने ३० % उत्पादन घटणार; केळी उत्पादक हवालदिल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चरका तसेच करपा रोगाने जळगाव जिल्ह्यातील केळीवर जोरदार हल्ला चढवला आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्के क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने यंदा किमान ३० टक्के केळीचे उत्पादन व गुणवत्ता घटण्याचा अंदाज केळीतज्ज्ञ व शास्त्रज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. केळी उत्पादक शेतकरी नुकसानीच्या भीतीने हादरला आहे. शासनाने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

दरवर्षी रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव या तालुक्यांमध्ये केळीची लागवड करण्यात येते. ४४ हजार हेक्टर एवढे केळीचे क्षेत्र आहे. बहुसंख्य लागवड रावेर व यावल या दोन तालुक्यांमध्ये आहे. ४४ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी जवळपास ६० टक्के क्षेत्रावर ‘चरका’ पडला असून, बागा पिवळ्या पडल्या आहेत.  करपा, चरका, गारपीट व वादळाचा दरवर्षी तडाखा बसत असल्याने केळीचे क्षेत्र घटू लागले आहे. तसेच उत्पादनातही घट होत आहे. 


का पडला चरका?... १५ डिसेंबरपासून केळीपट्ट्यात रात्रीचे तापमान सलगपणे १० अंश सेल्सिअसच्या आतच आहे. त्यामुळे  केळीच्या झाडाची पाने पिवळी पडली आहेत. यालाच स्थानिक भाषेत चरका म्हणतात.  

 

गुणवत्ता घटणार : अन्नाच्या कमतरतेमुळे केळी निसवण्यास विलंब होत असून, घडाचा आकार, वजन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन व गुणवत्ता साधारणत: ३० टक्के घटण्याची भीती शास्त्रज्ञांनी केळी पट्ट्यातील बागांची पाहणी केली असता व्यक्त केली आहे. 

थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास नुकसान अधिक  


महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका आहे. रात्रीचे तापमान १० अंशांच्या आत आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास चरक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तो वाढल्यास नुकसान अधिक होईल. त्यामुळे तापमानाचा पारा केव्हा उंचावेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

बातम्या आणखी आहेत...