आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला एमआयडीसीच्या 5 बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल, बनावट कागदपत्रे तयार करून आगीत जळाल्याचा केला बनाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला : अकोला औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रिय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे बनवली व खोट्या व बनावट नोंदी केल्या. हीच कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध भूखंड घोटाळाप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिघे फरार आहेत.

अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालिन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक (रा. गणपती नगर लॉडर्स होस्टेल जवळ अमरावती), अमरावतीचे तत्कालिन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील (रा. उमरेड जि. नागपूर), अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके (रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती), रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रुपराप चंदन (रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ अकोला) व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारूतराव पेटकर (रा. मालेवाडा रोड नागपूर) या अधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुळके यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाह्य कृत्य करून बनावट दस्तावेज तयार केले व ते दस्तावेज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाचे वाटप उर्वरित अधीमुल्याची रक्कम न भरताच भूखंडाची नस्ती तयार केली व खोट्या व बनावट नोंदी करून आकव जावक रजिस्टरच आरोपींनी गहाळ केले व २५ डिसेंबर २०१७ रोजी कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगित जळाल्याचे सांगितले व एक हजार चौरस मिटरचा भूखंड वाटपपत्राद्धारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लास्टीक यांना करण्यात आले. यावेळी भूखंडाचे वाटपावेळी सहायक क्षेत्रव्यवस्थापक अविनाश चंदन होते. त्यांनी तीन लाख रुपयांचा भरणा करून न घेताच भूखंडाचे वाटप केल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध भांदवीचे कलम ४२०, ४०६,४६७,४६८,४७१,२०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

त्रिसदस्सीय समितीने केली चौकशी

आरोपींनी भूखंडाचे वाटप करतेवेळी टीपणी सादर केली. तसेच सदर भूखंडाचे वाटपपत्रावर खाडाखोड केली असून वाटपपत्र बनावट असल्याचे दिसून आले. तसेच सदरचे वाटपपत्र ज्या काळात निर्गमित करण्यात आले त्या काळातील आवक जावक रजिस्टर हे कार्यालयातून गहाळ केले. या भूखंडासंदर्भात कुंदा वासनिक यांनी १४ ऑगस्ट २०१७ रोजी भूखंडधारकासोबत गैरकायदेशीर करारनामा केला, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत समोर आले.