आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल पथकांवर हल्ला प्रकरण : किरण हजारेसह १२ जणांवर मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोपरगाव तालुक्यातील वारी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण, शासकीय वाहनाचे नुकसान करणाऱ्या किरण हजारे व त्याच्या १२ साथीदारांविरोधात नाशिक येथील विशेष मोक्का न्यायालयात मोक्काच्या वाढीव कलमासह दोषाारोपपत्र दाखल करण्यात आले. 


शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अवैध वाळूविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलिस रेकाॅर्डवरील संशयित किरण हजारे याचे गाव असलेल्या वारी (ता. कोपरगाव) या गावात अवैध वाळू वाहतूक करणारा ढंपर ताब्यात घेण्यासाठी गेले असता या पथकांवर हजारे व त्याच्या साथीदारांनी ढंपर घालून तो पळवून नेला. तो ढंपर पाठलाग करुन पकडला असता हजारे व त्याच्या साथीदारांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दशहत निर्माण करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच शासकीय वाहनाच्या काचा फोडल्या. 


या प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक योगेश पालवे यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव पोलिस ठाण्यात प्रारंभी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीनंतर या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर अक्षय बारसे, गणेश हजारे, जालिंदर खंडीझोड, योगेश भड, किरण हजारे, सुरज ठाकूर, प्रदीप जायभाये, अनंत जायभाये, सागर धोत्रे, अजय महिरे, रवी मोरे, प्रतीक गोंदकर यांच्याविरुध्द मोक्काचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मोक्काचे वाढीव कलम लावण्यात आले होते. नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात किरण हजारे याच्यासह बारा जणांविरुध्द मोक्काच्या वाढीव कलमासह दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तपासासाठी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहीदास पवार, अभिजित शिवथरे, प्रांताधिकारी डॉ. सागर पाटील, निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, तत्कालीन निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी परिश्रम घेतले. 

बातम्या आणखी आहेत...