आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छै छैया छै.. छपाक छै!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा कांबळे

बायकांवर होणारी हिंसा थांबवायची असेल तर तिच्या शरीराला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. स्त्री ही पुरुषासारखीच आहे.सजीव चेतना असलेली स्वतंत्र चेतना असलेली. तिच्या आत्मसन्मानाला जपण्याचा संस्कार घराघरातून शाळांमधून मिळायला हवा...


छै छैया  छै.. छपाक छै 
पानियो पें  छिटे उडाती ..हुई लडकी
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘ हुतूतू’ या चित्रपटात गुलजार यांनी त्यांच्या खास शैलीत लिहिलेले हे गाणे आहे. या गाण्यातील तरल शब्दावर थुईथुई नाचणारी मुलगी समुद्राच्या पाण्यावर तुषार उडवत असते. पण वास्तवात मात्र ही मुलगी आनंदी नसते. या चित्रपटाच्या नायिकेला तिच्या आईचे भ्रष्ट राजकारण पसंत नसते. पण सत्तेला चटावलेली तिची आई मुलीच्या विरोधाला काहीच भीक घालत नाही. शेवटी मुलीला आईचे राजकीय विरोधक किडनॅप करतात. त्यात नायिकेचा गतकाळातील प्रियकरही असतो. सत्तेने उन्मत्त झालेल्या आईला धडा शिकवण्यासाठी मुलगी टोकाचा निर्णय घेते. अपहरण झालेली मुलगी आईच्या राजकीय मेळाव्यात प्रकट होते ते कमरेला सुसाइड बॉम्ब बांधून. बेल्टवरील बटण दाबून ती  स्वतःला आणि आईलाही संपवते....हिंसेच्या मार्गाने एका हिंसक राजकारणाचा शेवट होतो. पाण्यावर तुषार उडवणारी मुलगी छपाक करून रक्ताची अंघोळ करून या जगाचा निरोप घेते.  छै छया छै छपाक छै – करत नाचणारी मुलगी आपल्या मनात रुंजी घालत राहते.

तर याच नादमधुर ओळींतील एक  ‘छपाक’ शब्द घेऊन मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला एक चित्रपट या महिन्यातच भारतभर प्रसिद्ध झाला. दीपिका पदुकोण या भारतातील आघाडीच्या नायिकेने छपाक चित्रपटात एका अॅसिडपीडितेची भूमिका केली. या चित्रपटाची कथा लक्ष्मी अगरवाल या अॅसिडपीडितेच्या जीवनावर आधारलेली आहे. तिच्या परिचयाच्या एका माणूस छपाक करून लक्ष्मीच्या निरागस चेहऱ्यावर अॅसिड फेकतो आणि क्षणार्धात तिचा लोण्यासारखा चेहरा कोळसा होऊन जातो. एका सेकंदात घडणाऱ्या या दुर्दैवी हल्ल्याने लक्ष्मीचे अवघे आयुष्यच बदलून जाते. अात्यंतिक वेदना घेऊन पुढे ठाकलेल्या आयुष्याशी तिला झुंज द्यावी लागते. लक्ष्मीच्या संघर्षाला दीपिकाने आपल्या अभिनयाने न्याय दिलेला आहे. खरे तर हा हटके विषय स्वीकारूनच दीपिकाने आपली अभिनेत्री म्हणून ताकद दाखवून दिलेली आहे. कारण सिनेमा म्हटले की सुंदर चेहऱ्याची नायिका या गृहीतकालाच या चित्रपटाने नकार दिला आहे. यात दीपिकाने मेकअप केलाय. पण तो मेकअप चेहरा कोरीव करण्यासाठी नाही तर विद्रूप करण्यासाठी केला गेलाय. यासाठी ती अभिनंदनास पात्र आहे.

दुर्दैवाने छपाक जिच्या आयुष्यावर बेतलेला आहे ती अॅसिड अटॅक झालेली लक्ष्मी एकटीच मुलगी भारतात नाही. भारतात तिच्याप्रमाणे अनेक मुलींच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून त्यांना विद्रूप केले जाते. मुलींच्या जिवावर उठलेले हे लोक तिच्या परिचयाचे, कुटंुबातील असतात. खूपदा असे हल्ले हे एकतर्फी प्रेमातून झालेले असतात.या मुलींनी गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाला, लग्नाला, मैत्रीला नकार दिलेला असतो. त्याची शिक्षा म्हणून या मुलींच्या चेहऱ्यावर छपाक करून अॅसिड टाकलेले असते. पण अशा घटना फक्त भारतातच होत नाहीत, तर संपूर्ण आशिया खंडच स्त्रियांच्या बाबतीत अतिशय हिंसक आहे. 

आपल्या शेजारील पाकिस्तानमधील पहिला ऑस्कर मिळालेली डॉक्युमेंटरी ‘सेव्हिंग फेसेस’(२०१२)  यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अशा घृणास्पद अॅसिड अटॅकचे डॉक्युमेंटेशन केलेले आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये महंमद जावेद हा लंडनमध्ये काम करणारा पाकिस्तानी वंशाचा प्लास्टिक सर्जन आत्यंतिक तळमळीने या पीडितांची त्वचारोपणाची शस्त्रक्रिया पार पडत असतो. एका संवेदनशील पुरुषाचा या पेशंटकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोन आपल्याला अचंबित करून जातो. इथे एक पुरुष डॉक्टर आपले सारे कौशल्य त्या मुलींच्या जखमा बऱ्या करण्यासाठी पणाला लावत असतो. तर दुसरीकडे पुरुषच त्यांच्यासारख्याच हाडामांसाने बनलेल्या स्त्रियांना जखमी करत असतो. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची माहिती घेत जर खोलात गेलो तर काळीज चिरून टाकणारी माहिती मिळत जाते.....योनीत रॉड घालणे (निर्भया केस), पित्याने मुलाला बलात्कारासाठी बोलावून घेणे (आसिफा वय वर्षे ८), खैरलांजी(आई व मुलीच्या गुप्तांगाची केलेली विटंबना), कोपर्डी प्रकरण (आधी मुलीची छेडछाड मग गँगरेप), गुंगीचे औषध देऊन बालिकांवर बलात्कार (मुझफ्फर शेल्टर होम)
अॅसिड अटॅक हा बायकांवरील लंैगिक हिंसेचा एक प्रकार झाला. स्त्रियांच्या शरीरावर केल्या जाणाऱ्या भयंकर हिंसा अशा अनेक प्रकारच्या आहेत. हालहाल करून स्त्रीदेहाची विटंबना केली जाते आणि हे आजचेच नाही तर विटंबनेचा हा इतिहास अतिशय प्राचीन आहे. पुराण, स्मृतीकाळात सती म्हणून स्त्रियांना चितेवर चढवले जायचे. मध्ययुगातील युरोपात चेटकिणी म्हणून अनेक स्त्रियांना जाळण्यात आले. सैन्याने आक्रमणे केली की बायकांनाही लुटले जायचे. दंगलीच्या काळात परधर्मीय बायकांची अब्रू धुळीस मिळवणे हे कर्तव्य समजले जाते.... हिंसेची कारणे व काळ बदलत राहतो, पण स्त्रियांवरचे अत्याचार मात्र थांबत नाहीत.

आज दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींचा दयेचा अर्ज निकालात निघालेला आहे. तब्बल सात वर्षांनंतर त्यांना शिक्षा मिळणार आहे. न्याय देण्याची प्रक्रिया प्रदीर्घ काळ चालणारी व किचकट आहे म्हणून लोक उतावीळ होऊ लागलेत. तेलंगणातील पशुवैद्यकीय डाॅक्टरच्या गँगरेप व खुनातील आरोपींचे एन्काउंटर झाले तेव्हा लोकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. गुन्हेगारांना झटपट शिक्षा मिळाली म्हणून जल्लोष केला गेला.व्हाॅट‌्सअॅपवर एकमेकांचे अभिनंदन केले गेले....पण यामुळे मुलींवर होणारी हिंसा थांबणार आहे का? गुन्हा घडूच नये यासाठी काय करायला पाहिजे. गुन्हेगार हे आपल्याच समाजातून निर्माण होतात ना...मग समाजाला झालेला रोग जोपर्यंत मुळापासून बरा होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही.

चल छैया छैया छैया... हे आयटम सॉँग आपण सगळ्यांनी पाहिले आहे ना...त्याच्यावर नाचलोही असू. तर आयटम सॉँग म्हणजे काय प्रकरण असते.. आयटम सॉँग म्हणजे सिनेमाच्या कथानकात गरज नसताना मार्केट काबीज करण्यासाठी घातलेले एखादे हॉट सॉँग.अशा गाण्यांमध्ये कमीत कमी कपडे घातलेल्या मुलीला घेतले जाते. 

तिला उत्तान डान्स स्टेप्स  दिल्या जातात.भडक प्रकाशयोजना करून अश्लील गाण्याच्या शब्दांवर तिला नाचवले जाते.बाईच्या देहाचे हे कमॉडिफिकेशन आपण घरात टीव्हीसमोर बसून पाहत असतो. याच गाण्यावर लहान मुली वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजमध्ये अंग मुरडत नाचत असतात. आपल्याला मुलांच्या शाळेच्या सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही असे डान्स बसवले जातात. रोगी मन असे घडवले जाते. स्त्रीदेहांचे वस्तूकरण असे होत राहते. त्यामुळेच जर बायकांवर होणारी हिंसा थांबवायची असेल तर तिच्या शरीराला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. स्त्री ही पुरुषासारखीच आहे. सजीव चेतना असलेली. स्वतंत्र चेतना असलेली. तिच्या आत्मसन्मानाला जपण्याचा संस्कार घराघरातून शाळांमधून मिळायला हवा. ..

छै छैया छै छपाक छै असे म्हणत समुद्रांच्या लाटांवर नाचणारी मुलगी खरे तर आकाशाला कवेत घेऊ शकते. गरज आहे तिच्यासाठी एक नवं जग तयार करण्याची, तिच्या बंदिस्त आभाळाला मोकळं करण्याची.

(लेखात व्यक्त झालेली मते ही लेखिकेची व्यक्तिगत मते आहेत.)

संपर्क - ९९६९२३४९६१

बातम्या आणखी आहेत...