आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह त्यांच्या पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी प्रकरणात कथित संचालक गणपती कांबळे यांनी ठोंबरे पती, पत्नीने आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.
 
लाडेगाव येथील गणपती सैनाप्पा उर्फ सोनाप्पा कांबळे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीचे संचालक आहेत.  सूतगिरणीत झालेल्या आर्थिक व्यवहारात संचालक म्हणून घेतलेली स्वाक्षरी ही आपण केली नसून सूतगिरणीचे चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे व आमदार संगीता ठोंबरे यांनीच आपली बनावट सही केली आहे. सदर झालेल्या आर्थिक व्यवहारात आपला कसल्याही प्रकारचा संबंध नाही. ठोंबरेंनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा आश्विनी पवार या फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथपत्र जोडून हे प्रकरण केजच्या न्यायालयात दाखल केले होते.    सदर प्रकरणी चौकशी करून आमदार संगीता ठोंबरे, चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत अशी मागणी कांबळे यांनी केली होती. 

केजच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा थोरात यांनी ठोंबरे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान,  मंगळवारी या प्रकरणी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात केज पोलिस  ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांनी याला दुजोरा दिला.
 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अडचणींमध्ये वाढ 
 संगीता ठोंबरे या भाजपच्या केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याने निवडणुकीत विरोधकांसाठी हे आयते काेलीत झाले आहे.  आमदार ठोंबरे यांनी सुरुवातीलाच हा प्रकार आपल्या विरोधातील षडयंत्र असल्याचे सांगितले .

बातम्या आणखी आहेत...