आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन रिचार्जच्या नावाखाली फसवणूक; इंदूरच्या दांपत्याचा साडेसतरा लाखांचा गंडा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बिग किंग वाॅलेट व आतिया पे वर्ल्ड हे ऑनलाइन रिचार्ज अॅप्लिकेशन तयार करून इंदूर येथील दांपत्याने जळगाव शहरातील दोघांची ऑनलाइन रिचार्ज बॅलेन्सच्या नावाखाली तब्बल साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

समीर शेख उर्फ राजाभाई उर्फ मोहंमद कलिमोद्दीन खान व इरशादबी समीर शेख (दोघे रा. इंदूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दांपत्याची नावे आहेत. रामेश्वर कॉलनीतील या दाेघांनी बिग किंग वॉलेट नावाच्या मोबाइल, डीश टीव्ही रिचार्ज करण्याचे अनोंदणीकृत अॅप्सच्या माध्यमातून दाेन रिचार्जधारकांची साडेसतरा लाखांत फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे हे अॅप बंद करून इतरही रिचार्जधारकांची त्याने आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आला. यात मुक्ताईनगरातील भाविक रमेशचंद्र वेद (जळगाव) यांनी समीर शेख (रा. रामनगर अपार्टमेंट, रामेश्वर कॉलनी) याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

 

दरम्यान, शेख दांपत्य रामेश्वर कॉलनीत राहत होते. वेद यांचे जळगावातील मुक्ताईनगरात ध्रुव कम्युनिकेशन नावाचे मोबाइल, डीश टीव्ही रिचार्ज करण्याचे दुकान आहे. मोहंमद याने वेद यांची भेट घेऊन जास्त नफा मिळवण्यासाठी मोबाइल रिचार्ज करण्याचे वॉलेट तयार केले असल्याचे सांगितले. तसेच त्यातून रिचार्ज केल्यास प्रत्येक रिचार्जमागे १० टक्के नफा मिळेल, अशी बतावणी केली हाेती. त्याने बिग किंग वॉलेट असे त्या अॅपचे नाव सांगितले. वेद यांनी सुरुवातीला वॉलेटमध्ये १० हजार रुपयांचा बॅलेन्स घेतला. त्यासाठी एनईएफटीद्वारे त्याच्या बँक खात्यावर पैसे भरले. त्यानंतरही वेळोवेळी पैसे देऊन दोघांमध्ये व्यवहार सुरू होता. १५ नोव्हेंबर रोजी वेद यांनी शेख याच्या बँक खात्यात ३ लाख ६० हजार रुपये टाकून रिचार्ज बॅलेन्स विकत घेतला होता; परंतु, १६ नोव्हेंबर रोजी ३ लाख ६० हजार रुपयांच्या बॅलेन्समधून इतर ग्राहकांचा मोबाइल व डीश टीव्ही रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला असता रिचार्ज होत नव्हते. त्यामुळे शेख याने वेद यांची ३ लाख ४० हजार ३४ रुपयांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे अमान इरफान अन्सारी (वय २०, रा. फातिमानगर, जळगाव) यांचीही १४ लाख ५ हजार रुपयांनी फसवणूक झाली आहे. या दोघांनी ऑनलाइन रिचार्ज बॅलेन्सच्या बदल्यात आयएमपीएस, आरटीएजीएस व एनईएफटीने ऑनलाइन व रोखीने हा व्यवहार केला हाेता. या प्रकरणी अन्सारी यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

दरम्यान, मोहंमद याने कृउबासच्या कॉम्प्लेक्समधील शेरा चौकातील त्याचे अतिया मोबाइल अॅण्ड गिफ्ट गॅलरी हे दुकान विक्री केले आहे. त्याच्या घराचा पत्ताही बदलून दोघे पती-पत्नी फरार झालेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...