आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- डिजिटल इंडियाच्या नावाने मोबाइल, ऑनलाइन बँकिंगचा गाजावाजा करणाऱ्या बँकाच अपडेट नसल्यामुळे एका महिला ग्राहकास त्याचा फटका बसला. भामट्यांनी थेट गुगल सर्च इंजिनवर असलेला बँकेचा फोन नंबर बदलल्यामुळे एका महिला ग्राहकाची दिशाभूल करून भामट्याने स्वत:चा नंबर टाकल्यामुळे महिलेने त्याच्याशी संवाद साधला. या संवादातून महिलेच्या दुसऱ्या बँक खात्याची माहिती घेत भामट्याने १३ हजार रुपयांची ऑनलाइन खरेदी केली. संबंधित बँकेचा फोन नंबर अपडेट नसल्यामुळे हा गंभीर प्रकार घडला आहे, तर भामटे गुगल सर्च इंजिनमधील माहितीमध्येही छेडछाड करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
अर्चना शिरीष मोरे (४८, रा. भोईटेनगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. फसवणुकीची रक्कम कमी असली तरी यातून गंभीर प्रकार समोर आला आहे. अर्चना यांची मुलगी जयपूर येथून नुकतीच जळगावात आली आहे. तिच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यात आले आहे. त्याची सबसिडी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या खात्यावर येत होती. आता त्यांना बँक ऑफ इंडियाच्या खात्यात सबसिडी हवी होती. त्यानुसार अर्चना यांनी प्रक्रिया केली. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील सबसिडी वर्ग झाली नाही. अखेर त्यांना ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समधून 'सीआयएफ' लिंक आणण्याचा सल्ला दिला गेला. त्यासाठी सोमवारी अर्चना यांनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचा फोन नंबर मिळवण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा वापर केला. त्यावर त्यांना ०७००४३४६६२२ हा क्रमांक मिळाला. या क्रमांकावर फोन करून त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या क्रमांकावरून बोलणाऱ्या भामट्याने अर्चना यांना गॅरंटर म्हणून कोणी तरी पाहिजे असल्याचे सांगितले. अर्चना या स्वत: गॅरंटर झाल्यानंतर भामट्याने त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्याची सविस्तर माहिती घेतली. मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) विचारून घेतला. यानंतर काही वेळातच अर्चना यांच्या खात्यातून तीन वेळा करून १३ हजार रुपयांची ऑनलाइन खरेदी करण्यात आली. बँकेतून पैसे वजा झाल्याचे मेसेज येताच अर्चना यांना धक्का बसला. त्यांनी पुन्हा तो नंबर डायल केला असता बंद आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळ जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
अधिकृत संकेतस्थळ वेगळे
बँकेचे अधिकृत संकेतस्थळ वेगळे आहे. गुगल सर्च इंजिनवर माहिती अपलोड करण्याची जबाबदारी बँकेची नाही. आम्ही नंतर मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आहे. त्यानुसार आता गुगल सर्च इंजिनवर खरा फोन नंबर अपलोड करण्यात आला आहे. ग्राहकांनी फोनवरून कोणतीही माहिती देऊ नयेे, अशा सूचना आम्ही वारंवार देत असतो.
- भगवानराव देठे, व्यवस्थापक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.