आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मेटे यांच्या नावाने पोलिस निरीक्षकालाच घातला ६ लाखांचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर, शेवगाव- आमदार विनायक मेटे यांच्या नावाने चक्क पोलिस निरीक्षकालाच ६ लाख २० हजारांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार शेवगाव येथे घडला. गोविंद ओमासे असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे, तेथे सामान्य नागरिकांचे काय? अशी उलटसुलट चर्चा खाकी वर्दीबाबत जिल्हाभर सुरू झाली आहे. शेवगाव येथील पोलिस ठाण्याचे प्रमुख ओमासे यांची चक्क सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमदार विनायक मेटे यांचा फाेनवर हुबेहूब आवाज काढून ही फसवणूक करण्यात आली. शिवसंग्रामचा शेवगाव तालुकाध्यक्ष इसारवाडे याने मी आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक असल्याचे सांगत ओमासे यांचा विश्वास संपादन केला. ९४२३२४९१९१ हा मेटे यांचा मोबाइल क्रमांक असल्याचे भासवत त्यावरून वारंवार मेटे यांच्याच आवाजात त्याने फोन केले. शेतीची कामे सुरू आहेत, पैशांची गरज आहे, अषी वेगवेगळी कारणे सांगत त्याने मेटे यांच्या नावाने ओमासेंकडून लाखो रुपये उकळले. इसारवाडे व त्याच्या साथीदाराने संगनमत करून ओमासे यांची फसवणूक केली. याप्रकरणी ओमासे यांच्या फिर्यादीवरून इसारवाडे व त्याच्या साथीदाराविरुध्द भादंवि कलम ४१९,४२० ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन मगर पुकरत आहेत. 


ऊस लावण्याचे कारण 
इसारवाडे व त्याच्या साथीदारांनी ओमासे यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याशी वारंवार फोनवरून आमदार मेटे यांच्या आवाजात संभाषण केले. त्यानंतर शेतात खुरपणीसाठी, कधी उसाची लागवड करण्यासाठी, तर कधी घरगुती कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे उकळले. हा सर्व प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता. दीड लाख, पन्नास हजार, एक लाख असे करत सहा महिन्यांत तब्बल ६ लाख २० हजार रुपये ओमासे यांच्याकडून उकळण्यात आले. 


मेटे यांना उसने म्हणून दिले पैसे 
एक आमदार आपल्याशी फोनवर बोलतोय, हे पाहून ओमासे यांचा विश्वास बसला. ओमासे यांनी सहा महिन्यांत उसने म्हणून पैसे दिले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर इसारवाडे व त्याच्या साथीदाराच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांचाही शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
- नितीन मगर, तपासी अधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...