आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना ‘नो स्मार्टफोन’ चॅलेंज देऊन तर पाहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या जगात बहुतांश लोक जिथे स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाहीत, तिथे न्यूयॉर्कच्या क्वीन्स परगण्यातील २९ वर्षीय इलेना मुगडन हिने शपथ घेतली आहे की, स्मार्टफोनला कधी हात लावणार नाही. पुढच्या वर्षी तिचा हा पण पूर्ण झाला तर या क्षेत्रातील गुरू बनेल, अशी मला भीती वाटते. इलेना स्मार्टफोनवर रोज तीन तास घालवत होती. तेव्हा डिसेंबर २०१८ मध्ये कोका कोलाची सहयोगी कंपनी असलेल्या ‘व्हिटॅमिन वॉटर’ ने इलेनाला एका अनोख्या स्पर्धेसाठी निवडले. यात एक वर्ष पूर्णपणे स्मार्टफोन न वापरता राहायचे, ती जिंकली तर एक लाख डॉलरचे बक्षीस मिळणार. यासाठी कंपनीने तिला फक्त कॉल करण्याची व मेसेज सुविधा असणारा फोन दिला आहे. या आव्हान स्पर्धेचे आठ महिने पूर्ण झाले असून फेब्रुवारी २०२० मध्ये ही स्पर्धा संपेल. यानंतर इलेनाला एक लाय डिटेक्टर टेस्ट द्यावी लागेल. स्मार्टफोनशिवाय राहणे ही निश्चितच चांगली कल्पना आहे. ती आणखी चार महिने आपल्या संकल्पावर ठाम राहिली तर तिच्या बँक खात्यात अंदाजे ७१ लाख रुपये जमा होतील. दरम्यान, इलेनाने स्मार्टफाेनशिवाय जगणे म्हणजे एक पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे. आता माझे डोळे उघडल्याचे ती सांगते. स्मार्टफोन सुटल्याने खराब सवयी सुटल्या असून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आता जीवन हळूहळू बदलण्याचा माझा प्रयत्न असून संकल्प करत गॅजेट्सशिवाय जीवनात संतुलन आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ती म्हणते. ती पुढे म्हणते की, “मी आता पूर्णपणे स्मार्टफोनशिवाय जगत असून मला त्याची अजिबातच गरज नाही. आता स्मार्टफोन कधीच वापरायचा नाही असे मी ठरवून टाकले आहे. स्मार्टफोन न वापरल्याने मी आता तब्बल १२५ टक्के जास्त प्रॉडक्टिव्ह बनले आहे. या वर्षात ३० पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. माझे झोपण्याचे वेळापत्रक सुधारल्याने मी फार आनंदित आहे. ज्यांना मी दूर केले होते अशा नातेवाइकांशी मी आता जुळवून घेत आहे. गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने मी स्मार्टफोनचा वापर करत होते, त्याच्या आठवणी वेदनादायक आहेत, असे सांगताना ती म्हणते की, “मी वास्तवात वेळ घालवण्यापलीकडे खरेच काही करत नव्हते. मी त्याचा किती वाईट पद्धतीने वापर करत होते, हे आता मला कळत आहे. मला त्याचे जणू व्यसनच लागले होते. खरेच मी त्याचा दुरुपयोग करत होते. दिवसांतील तीन तास काहीही न करता मी वेळ बरबाद करत होते. म्हणजे वर्षभरातील ११०० तास वाया घालवत होते. या वेळेत तर मी एखादे पुस्तक लिहिले असते. इलेना ही अशी एकटीच स्मार्टफोन युजर नाही. लहान असो किंवा मोठा, सर्वजण स्मार्टफोनला जणू चिकटलेला आहे. स्मार्टफोनमुळे लोकांच्या सामाजिक आणि मानसिक यातना वाढल्यामुळे शास्त्रज्ञ काळजीत आहेत. अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी आपला बहुतांश वेळ आयफोनवर जात असल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. लक्षात ठेवा, असे अनेक युवक आहेत, ज्यांना अशा प्रकारचे आव्हान स्वीकारायचे आहे आणि जीवन स्मार्टफोनशिवाय व्यतीत करायचे आहे. पण कुणीतरी आपल्याला असे आव्हान द्यावे आणि नंतर सन्मानितही करावे, असे त्यांना वाटते. आपल्या मुलांना असे चॅलेंज देऊन पाहावे.  

फंडा असा : आपल्या मुलांसमोर आकर्षक योजना ठेवा आणि अशा प्रकारचे चॅलेंज त्यांना द्या. त्यांचे त्यांनाच समजू द्या की, स्मार्टफोनच्या तुलनेत तेच जादा स्मार्ट आहेत.