आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतील पहिले व एकमेव सचित्र-गांधीचरित्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतन कोळी  

महात्मा गांधी यांच्या दीडशेच्या जयंतीचे औचित्य साधून ‘रोली बुक्स’ या प्रकाशन संस्थेचे प्रमुख प्रमोद कपूर यांनी लिहिलेला आणि गांधीजींच्या विविध छायाचित्रांनी सर्वांग परिपूर्ण असलेला ‘गांधी-अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी’ हा वेगळ्या आकारातील ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे.
 
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून ‘रोली बुक्स’ या प्रकाशन संस्थेचे प्रमुख प्रमोद कपूर यांनी लिहिलेला आणि गांधीजींच्या विविध छायाचित्रांनी सर्वांग परिपूर्ण असलेला ‘गांधी - अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी’ हा वेगळ्या आकारातील ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. कपूर यांनीही गांधीजींचा आपल्या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला असून, त्यांनी या संदर्भात जे प्रकरण उपोद्घातासाठी लिहिले आहे, त्याचे शीर्षकच आहे ‘माय एक्सपेरिमेन्ट वुईथ गांधी’. या प्रकरणात आपण गांधीजींवर एक पुस्तक लिहिण्यासाठी कसे उद्युक्त झालो आणि त्यासाठी किती लोकांना भेटलो, त्याबरोबरच फोटोंची निवड कशी केली, या सगळ्याचा धांडोळा त्यांनी घेतला आहे. या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आता ‘मंजुल पब्लिशिंग हाउस’ या पुण्यातील मराठी प्रकाशन संस्थेने केला आहे. सविता दामले यांनी हा मराठी अनुवाद केला असून, प्रमोद कपूर यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाला कोणतीही बाधा न आणता गांधीजींचे सचित्र जीवनदर्शन वाचकांना घडेल, हे लेखकीय दायित्व त्यांनी कुशलतेने पार पाडले आहे.

प्रमोद कपूर यांच्या या ग्रंथात जवळपास २०० पेक्षा अधिक फोटोंचा वापर करण्यात आल्यामुळे साहजिकच त्याची आकर्षकता वाढली आहे. गांधीजींच्या चरित्रातील कालखंड विभागून प्रकरणांची रचना त्यांनी केली आहे. या कालखंडानुसार त्यांनी एकूण सहा प्रकरणांत ग्रंथाची विभागणी केली आहे. उपोद्घाताचे प्रकरण ‘गांधी या विषयावरील माझा प्रयोग’ या शीर्षकाचे आहे. हे प्रकरण वाचत असताना आपल्या घरामध्ये आई-वडिलांसह अनेक आप्तजनांवर गांधीजींचा किती प्रभाव होता, याची आठवणीवजा माहिती त्यांनी दिली आहे. गांधीजींच्या आयुष्यातील वादंग विषय झालेल्या काही मुद्यांबद्दल आणि त्यांच्या जीवनातील विरोधाभासांबद्दल आपल्याला काय वाटते, याचे प्रतिपादनही कपूर यांनी यात केले आहे. ‘माझे जीवन हे खुले पुस्तक आहे,’ असे म्हणणाऱ्या गांधीजींच्या चरित्राशी संबंधित असलेली अनेक कागदपत्रे अद्यापही अप्रकाशित आहेत, याकडे लेखक लक्ष वेधतात. गांधीजींचा थोरला मुलगा हरिलाल याच्याशी त्यांचे झालेले मतभेद आणि निर्माण झालेला विसंवाद यांबाबतही त्यांनी या प्रकरणात प्रश्न उपस्थित केले आहेत. स्त्रियांचे गांधीजींकडे आकर्षित होणे, हा पैलू कपूर यांना गांधीजींच्या जीवनातील गुंतागुंतीचा विषय वाटतो. या विषयाबाबत लेखकाने आणखी काही तपशील या उपोद्घातात दिले आहेत. एकूणच गांधीजींचा हा शोध जगातील एका महान नेत्याचा जरी असला, तरी त्याच्याशी जोडलेल्या त्याच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचाही उलगडा वाचकांना हे पुस्तक वाचताना होईल.

पहिल्या प्रकरणात (१८६९-१९१४) भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील आरंभीचा काळ; दुसऱ्या प्रकरणात (१९१५-१९२९) भारतात आगमन, असहकार चळवळ आणि स्वातंत्र्याचे आवाहन; तिसऱ्या प्रकरणात (१९३०-१९३९) मिठाचा सत्याग्रह आणि गोलमेज परिषदा; चौथ्या प्रकरणात (१९४०-१९४६) क्रिप्सचा प्रस्ताव आणि छोडो भारत चळवळ; पाचव्या प्रकरणात (१९४६-१९४७) जातीय दंगली, फाळणी आणि स्वातंत्र्य आणि सहाव्या प्रकरणात (१९४८) हत्या आणि अंतिम संस्कार, असे विषय लेखकाने कालानुरूप मांडलेले आहेत. 

प्रमोद कपूर यांच्या पुस्तकात ‘गांधींचा मार्ग अनुसरणाऱ्या काही स्त्रिया’ असे एक उपप्रकरण आहे. त्यात नोंदल्याप्रमाणे मेडलिन स्लेड ऊर्फ मीराबेन, नीला क्रॅम कुक, सरलादेवी चौधराणी, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, मनू गांधी, डॉ. सुशीला नय्यर, एस्थर फेरिंग, आभा गांधी, सोनिया श्लेसिन, मिली ग्रॅहम पोलक, मार्गारेट स्पिगेल, सुचेता कृपलानी, प्रभावती यांचा उल्लेख आहे. 

हे गांधीजींचे छायाचित्रांसह असलेले जीवनदर्शन असल्यामुळे त्यांच्या चरित्रातील अतिशय दुर्मिळ आणि चांगले फोटो यात पाहायला मिळतात. गांधीजींच्या हस्ताक्षरातील काही पत्रे आणि तारांचे नमुने यात आहेत. गांधीजींनी दोन्ही हातांनी लिहिण्याची सवय ठेवली होती. हिंद स्वराज्य या पुस्तकाचे हस्तलिखित त्यांनी काहीसा असाच प्रयोग करून लिहिले. या दोन्ही हातांनी लिहिलेली हस्तलिखिताची दोन पाने यात पाहायला मिळतात. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांचे दुर्मिळ फोटो, भारतात आल्यानंतर गांधीजींचे झालेले स्वागत आणि सभा यांचे फोटो, मिठाच्या सत्याग्रहाची छायाचित्रे, गोलमेज परिषदेत सहभागी झालेल्या ८६ नेत्यांचे रेखाचित्र असलेले एक सुंदर चित्र आणि गांधीजींच्या हत्येनंतरचे जगभरातील पडसाद टिपणारी छायाचित्रे या ग्रंथात पाहायला मिळतात. मुखपृष्ठासह अनेक छायाचित्रे इतकी संवादी आहेत की, ती जणू गांधीजी आपल्या आसपासच वावरत आहेत, असेच वाटते. कस्तुरबांबरोबरची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आपल्याला यात दिसतात. गांधीजींचा जीवनक्रम सांगणारा तपशीलही यात आपल्याला वाचायला मिळतो.
 
> गांधी - सचित्र जीवनदर्शन 
> लेखक - प्रमोद कपूर 
> अनुवाद - सविता दामले
> मंजुल पब्लिशिंग हाउस, पुणे, 
> पृष्ठे (रॉयल साइज, पुठ्ठाबांधणी, अनेक दुर्मिळ छायाचित्रांसह) - ३२५, मूल्य - रु.९९९)

बातम्या आणखी आहेत...