आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेतन कोळी
परीक्षा, तणाव, करिअरचा निर्णय, मेडिकल की इंजिनिअरिंग... या दुष्टचक्रात अनेक जण पोळून निघतात. अशा पार्श्वभूमीवर, आपल्याला प्रेरणा देणारं, करिअरच्या प्रचलित धारणांना धक्का देणारं आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी यशस्वी होता येत,ं हा वस्तुपाठ देणारं पुस्तक आपल्या हाती आलं तर? सध्या परीक्षांचा मोसम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे करिअरची आणि एकूणच पुढच्या आयुष्याची दिशा ठरवणारे दोन निर्णायक टप्पे असतात. अर्थात, या टप्प्यांवर बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनावर संभ्रमाचं, तणावाचं मळभ असतं. पालक तर जणू काही स्वतःची परीक्षा असल्याप्रमाणेच तणावग्रस्त असतात. विद्यार्थी आणि पालकांसाठी या परीक्षा आणि त्यापुढचा करिअरचा निर्णय म्हणजे आणीबाणीचा बाका प्रसंग असतो. दरवर्षीच्या उन्हाळ्यात बरेचसे पालक आणि विद्यार्थी परीक्षा-तणाव-करिअरचा निर्णय-मेडिकल की इंजिनिअरिंग या दुष्टचक्रात चांगलेच पोळून निघतात. पण अशा पार्श्वभूमीवर, आपल्याला प्रेरणा देणारं, करिअरच्या प्रचलित धारणांना धक्का देणारं आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यशस्वी होता येतं हा वस्तुपाठ देणारं पुस्तक आपल्या हाती आलं तर? ही कथा आहे शिवराम भंडारी या केशरचनाकाराची. जग आज त्याला हेअरस्टाइलिस्ट शिवा या नावाने ओळखतं. मनात जपलेली सारी स्वप्नं पूर्ण करत यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शिवाच्या जीवनाची सुरुवातीची काही वर्षं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेली, तरीसुद्धा त्याने स्वतःच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला जागृत ठेवत, कठोर परिश्रमांची जोड देत, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती समोर उभी राहिली तरी निश्चित केलेल्या सुयोग्य ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करत आपण आपल्या करिअरच्या अत्युच्च शिखरावर विराजमान होऊ शकतो, याचा विश्वास प्रत्येक वाचकाच्या मनात जागी करणारी शिवाची ही जीवनगाथा स्टाइलिंग अॅट द टॉप या नावाने मंजुल पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली आहे. जयश्री लेंगाडे-शेट्टी यांनी लिहिलेल्या या प्रेरक पुस्तकाचा तितकाच सरस मराठी अनुवाद केला आहे, डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी. तुम्हाला कौन बनेगा करोडपती या अत्यंत गाजलेल्या टीव्ही शोमध्ये अमिताभ बच्चनची लक्ष वेधणारी दाढीची स्टाइल आठवतच असेल. बाळासाहेब ठाकरे यांची केशरचनाही आठवत असेल. बाळासाहेब, अमिताभ यांसारख्या मातब्बर मंडळींच्या केशरचना करणाऱ्या, अनेक फिल्मी अवॉर्ड फंक्शन्समध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांचं सौंदर्य खुलवणाऱ्या शिवराम भंडारी यांच्या कैचीने खरंच कमाल केली आहे. उत्तर मुंबईतल्या औद्योगिक वसाहतीमध्ये साध्याशा टपरीपासून सुरुवात करणारा शिवा आज किमान वीस सलून्सचा मालक आहे. उच्चभ्रू स्त्रियांसाठी वाळकेश्वर आणि जुहूमध्ये त्याचे विशेष सिग्नेचर सलून्स आणि पार्लर्स आहेत. चित्रपट आणि फॅशन जगतातील प्रसिद्धीच्या शिखरावर झळाळणारे अभिनेते, मॉडेल्स, निर्माते इतकंच नाही तर नेते आणि उद्योगपतीसुद्धा ज्याच्या सलूनमध्ये येतात, असा हा शिवराम भंडारी. बालपण म्हटलं की, घर, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, शाळा, दंगामस्ती, सौख्याचे क्षण, प्रेम, सुरक्षितता इत्यादी अनेक गोष्टी स्वाभाविकतः आपल्या मनात आकार घेतात; पण शिवाचं बालपण अगदीच वेगळं होतं. प्रेम आणि मायेची उणीव त्याच्या वाट्याला आली. खरं तर, त्याच्या बालपणाला ‘बालपण’ तरी कसं म्हणावं, असा प्रश्न आपल्याला पडतो. वाढीचे टप्पे भराभर ओलांडत लहान वयात शाळेला रामराम ठोकत, त्याला अर्थार्जन करणं भाग पडलं. पोटात दोन घास पडावेत म्हणून त्याच्या आईने अतोनात कष्ट उपसले. शिवाला कोवळ्या वयात कुटुंबकर्त्याची भूमिका पेलावी लागली. परिस्थिती अतिशय प्रतिकूल असूनही शिवा ठरवलेल्या मार्गावर नेटाने पुढे चालत राहिला. नियतीनं त्याला जेव्हा केव्हा संधी दिली, तेव्हा शिवाने त्या संधींचं अक्षरशः सोनं केलं. जगातील सर्वोत्तम संस्थांमधून त्याने केशरचना कला आत्मसात केल्या. परदेशात मिळालेल्या अनुभवामुळे आज शिवा यशस्वी व्यावसायिक व बॉलीवूडमधील लाडका आणि सर्वोत्तम हेअरस्टाइलिस्ट झाला आहे. केवळ डॉक्टर, इंजिनिअर होण्यातच करिअरची इतिकर्तव्यता नसून, स्वतःच्या क्षमता ओळखून; स्वतःतील अंगभूत कौशल्याला साजेसं करिअर निवडणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आतला आवाज ऐकतो आणि त्यानुसारच पुढची वाटचाल करतो, तेव्हा मार्गात कितीही अडथळे, अडचणी, संकटं आली तरी त्यावर मात करत पुढे झेपावण्याची ऊर्जा मिळत असते. आपल्या दुःखाचं भांडवल करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही शिवाची कहाणी आहे. स्वतःला ओळखलंत, आवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलंत तर एक साधी कैचीही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. शिवराम भंडारींचा हा थक्क करणारा प्रवास प्रेरणादायी तर आहेच; पण खेड्यापाड्यातल्या आणि शहरातल्या तरुणाईने कित्ता गिरवावा असाच आहे. संपर्क- ९२८४७५१२४६
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.