आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतेश्वर पुजाराचे सोळावे कसोटी शतक; टीम इंडियाच्या 250 धावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडिलेड - के.एल. राहुल, मुरली विजय, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर चेतेश्वर पुजाराने (१२३) आपले १६ वे कसोटी शतक साजरे केले. शतकाच्या जोरावर त्याने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावांपर्यंत पोहोचवले. 

रोहित शर्माने ३७, रविचंद्रन अश्विनने २५ आणि ऋषभ पंतने २५ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि नाथन लायनने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. पुजारा धावबाद झाला. त्यानंतर दिवसाचा खेळ समाप्त झाला. 

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. एक वेळ भारताच्या ४१ धावांत ४ विकेट आणि ८६ धावांवर ५ विकेट पडल्या. अाघाडीचे फलंदाज खराब शॉट खेळून तंबूत परतले. लोकेश राहुलला २ धावांवर असताना हेजलवूडने तिसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या अॅरोन फिंचच्या हाती झेल बाद केले. मुरली विजयनेदेखील खराब शॉट खेळत मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर टिम पॅनच्या हाती झेल दिला. कर्णधार विराट कोहलीला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाने गलीत शानदर झेल घेत तंबूत पाठवले. कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या ४ कसोटीत १५ पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. अजिंक्य रहाणेने १३ धावा केल्या. रोहित शर्मा चांगल्या लयीत होता, मात्र नाथन लायनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हॅरिसच्या हाती झेल दिला. पुजारा व रोहितने ४६ धावांची भागीदारी केली. 

 

चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियामध्ये झळकावले आपले पहिले शतक; २०१८ मधील ठरले दुसरे शतक 

०४ वेळा लायनने रोहितला बाद केले. कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा. 
०६ भारतीय ठरला पुजारा, पहिल्या दिवशी आशिया बाहेर शतक केले 

 

अव्वल ५ डावांपैकी माझी एक खेळी : चेतेश्वर पुजारा 

पुजाराने दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपली शतकी खेळी अव्वल ५ डावांपैकी एक असल्याचे म्हटले. खेळपट्टी फलंदाजांसाठी सोपी नाही, जेवढी टीव्हीवर दिसत होती. खेळपट्टीमध्ये दुहेरी उसळी आहे, त्यामुळे २५० धावसंख्येला कमी म्हणू शकत नाही. या खेळपट्टीवर अश्विनची भूमिका महत्त्वाची ठरेल. फलंदाजांनी थोडा संघर्ष केला असता, तर स्थिती अजून चांगली असती. 

 

पुजाराने ३, ४ आणि ५ हजार धावांसाठी राहुल द्रविडच्या बरोबरीने खेळले डाव 
चेतेश्वर पुजाराने आपल्या डावादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा १२ वा खेळाडू ठरला. योगायोग म्हणून पुजाराने १०८ डावांत आपल्या ५ हजार धावा पूर्ण केल्या. टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडनेदेखील ऐवढ्याच डावात ५ हजार धावा केल्या होत्या. पुजाराने आपल्या ३ हजार धावांसाठी ६७ डाव, ४ हजार धावांसाठी ८४ डाव खेळले. द्रविडनेदेखील आपल्या ३ हजार धावांसाठी ६७ डाव, ४ हजार धावांसाठी ८४ डावांत पुजारासारख्या धावा केल्या आहेत. द्रविडच्या निवृत्तीनंतर पुजाराकडे द्रविड म्हणून पाहिले जात आहे. 

 

पुजाराने सौरव गांगुलीच्या १६ शतकांची केली बरोबरी 
चेतेश्वर पुजाराने १६ शतकांसह माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या १६ शतकांची बरोबरी केली. भारतीय संघात त्याला सलामीपासून सर्व स्थानावर खेळवण्यात आले. त्याने प्रत्येक स्थानावर चांगली फलंदाजी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. पुजाराने ऋषभ पंतसोबत सहाव्या गड्यासाठी ४१ आणि रविचंद्रन अश्विनसोबत सातव्या गड्यासाठी ६२ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. पंतला नाथन लायनने अश्विनला कमिन्सने बाद केले. इशांत शर्मा चार धाव करत परतला. पुजाराने मोहंमद शमीसोबत नवव्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी करत संघाला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. कमिन्सच्या शानदार थेट फेकीवर पुजारा धावबाद झाला. 

 

धावफलक 
भारत धावा चेंडू ४ ६ 
राहुल झे.फिंच गो. हॅजलवूड ०२ ०८ ०० ० 
विजय झे. पिन गो. स्टार्क ११ २२ ०१ ० 
पुजारा धावबाद १२३ २४६ ०७ २ 
कोली झे. ख्वाजा गो. कमिन्स ०३ १६ ०० ० 
राहणे झे. हॅड्सकोम्ब गो. हॅजलवूड १३ ३१ ०० १ 
रोहित झे. हॅरिस गो. लायन ३७ ६१ ०२ ३ 
पंत झे. पिन गो. लायन २५ ३८ ०२ १ 
अश्विन झे. हॅड्सकोम्ब गो. कमिन्स २५ ७६ ०१ ० 
ईशांत त्रि. गो. स्टार्क ०४ २० ०१ ० 
मो. शमी नाबाद ०६ ०९ ०१ ० 
अवांतर : ०१. एकुण : ८७.५ षटकांत ९ बाद २५० धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-३, २-१५, ३-१९, ४-४१, ५-८६, ६-१२७, ७-१८९, ८-२१०, ९-२५०. गाेलंदाजी :स्टार्क १९-४-६३-२, हॅझलवूड १९.५-३-५२-२, कमिन्स १९-३-४९-२, लायन २८-२-८३-२, हीड २-१-२-०. 

बातम्या आणखी आहेत...