आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या धरतीवर पडलेले पाणी अडविले तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असे उदगार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी काढले. देवसाने- मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाचा उद्देश यशस्वी होताना पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे स्पष्ट केले. 


गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकते याचे उदाहरण म्हणजेच देवसाने-मांजरपाडा प्रकल्प आहे असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.आज आमदार छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि इतर मान्यवरांसहित निफाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


आंध्र प्रदेश सरकारने कालेश्वरम प्रकल्प राबविला या प्रकल्पात 650 मीटरहुन अधिक उंचीवर पाणी लिफ्ट केले आहे. त्याचप्रमाणे देवसाने मांजरपाडा प्रकल्पाकडे उदाहरण म्हणून बघावे आणि महाराष्ट्राचे गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून ते महाराष्ट्रात वळविले तर नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असेही सांगितले. महाराष्ट्रातून गुजरातला वाहून जाणारे पाणी वळण बंधारे आणि बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात आणणारा राज्यातील हा एकमेव प्रकल्प आहे. तर 10.16 किमी बोगद्याद्वारे पाणी वळवणारा हा पहिलाच प्रकल्प आहे असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

 


गुजरातमध्ये जाणारे पाणी आपण पूर्वेकडे वळवू शकतो त्याचे हे एक यशस्वी उदाहरण आहे. गुजरातला वाहून जाणारे पाणी आज ना उद्या उचलू पण पाण्याचा हक्क गुजरातला लिहून देऊ नका, यासाठी कितीही कर्ज काढावे लागले ते काढा त्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या आणि महाराष्ट्राच्या मातीवर पडणारा प्रत्येक थेंब महाराष्ट्राला मिळवून द्या असे आवाहन आमदार छगन भुजबळ यांनी केले. 


देवसाने मांजरपाडा प्रकल्प माझ्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक प्रकल्प असून आज तो पूर्ण केला आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. तसेच डोंगरगाव पुणेगाव दरसवाडी कालव्याचे अस्तरीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून शासनाने लवकर यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीदेखील आमदार छगन भुजबळ यांनी केली.

 

ज्या देवसानेसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या स्थानिक शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या जलपूजन कार्यक्रमाबाबत बोलतांना ते म्हणाले की जलसंपदामंत्र्यांनी जलपूजनासाठी बोलावले असते तर आजचा कार्यक्रम घेण्याची गरज पडली नसती असे सांगून पाण्याच्या बाबतीत राजकारण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. यावेळी 'वळचणीचे पाणी आढ्याला गेले' हा संत एकनाथांचा अभंग गाऊन छगन भुजबळ यांच्या अथक प्रयत्नामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळाल्याने ते आधुनिक भगीरथ असल्याचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले.


दुष्काळी चांदवड व येवला तालुक्याना पाणी पोहोचविण्याचे श्रेय त्यांनी छगन भुजबळांना दिले. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील जनतेचा त्याग अधोरेखित करून स्थानिक शेतकऱ्यांना चारणवाडी धरणामध्ये 100 दशलक्ष घनफूट पाणी राखीव ठेवण्याची मागणी त्यांनी केली.माजी आमदार धनराज महाले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या जलपूजन सोहळ्यासाठी येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...