आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षे शुकशुकाट अनुभवलेले ‘भुजबळ फार्म’ पुन्हा गजबजले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुरुंगात असताना पाठ फिरवलेले नेते, कार्यकर्ते मंत्रिपद मिळताच छगनरावांसमोर पुन्हा मिरवू लागले

नाशिक- सुमारे पाच वर्षे सत्तेपासून दूर, लोकसभा निवडणुकीतील पराभव.. त्यानंतर अडीच वर्षे तुरुंगवास आणि पुन्हा लोकसभेत पुतणे समीर यांचा व पाठोपाठ विधानसभेला पुत्र पंकज यांचा झालेला पराभव.. हे सर्व अपयश पचवून राष्ट्रवादी कांॅग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा सत्तारूढ झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. त्यामुळे तीन वर्षांपासून अोस पडलेले नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ पुन्हा गजबजू लागले आहे. भुजबळ तुरुंगात असताना ज्यांनी पाठ फिरवली तेच लोक आज मंत्रिपदी विराजमान झालेल्या भुजबळांच्या भेटीसाठी त्यांच्या मागेपुढे करताना दिसत आहेत.


‘भुजबळ संपले असे काही लोकांना वाटत होते, मात्र शरद पवार साहेबांच्या कृपेमुळे पुन्हा ‘हरिअोम’ झाला. आता जनतेच्या कामासाठी आपण झोकून देणार आहोत,’ असे भुजबळांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी प्रथमच भुजबळ नाशिकमध्ये आले होते. सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान ‘भुजबळ फार्म’वर त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.  पत्रकारांशीही संवाद साधला. भुजबळ म्हणाले, ‘राज्यातील घडामोडीमुळे आतापर्यंत मला नाशिकमध्ये येण्यासाठी वेळच मिळाला नाही. आता आलो आहे, सर्वांना भेटून येवल्यात जाईल. मंत्री म्हणून नाशिकला येणे या वेळी जरा वेगळे वाटत आहे. गेली पाच वर्षे अत्यंत खडतर होती.


भुजबळ संपले असेही काही लोकांना वाटत होते मात्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा जनसेवेसाठी ‘हरिअोम’ झाले. गेल्या पाच वर्षातील चढ उतार व त्यानंतर मंत्रिपद या माझ्या आयुष्यातील घटना सिनेमासारख्या आहेत. या काळात अनेकांनी खंबीर साथ दिली आहे. आता पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,’ असे भुजबळ म्हणाले.

बोट क्लब सुरू करणार
 
आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेेले अनेक मोठे प्रकल्प भाजपाच्या काळात बंद पाडले गेले. गंगापूर धरणावरील बोट क्लब या प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. हा बोट क्लब पुन्हा सुरू करणार असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. सप्तशंृगगडावरील फ्युनिक्युलर ट्राॅली, शहरातील उड्डाणपूल अशी अनेक कामे माझ्याकाळात यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या, असा दावाही भुजबळांनी केला.

कोणते खाते मिळणार ?
 
भुजबळांनी आजवर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी  महत्त्वाची मंत्रिपदे भुषवली आहेत. आता ठाकरे सरकारमध्ये त्यांना कोणते खाते मिळते याविषयी समर्थकांत उत्सुकता आहे.