Home | VidhanSabha 2019 | Chhagan Bhujbal too will get this assembly very difficult

मातब्बर छगन भुजबळांनाही यंदाची विधानसभा अवघडच; चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना ‘संकट' गडद

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 31, 2019, 03:33 PM IST

अडीच वर्षांनी तुरुंगाबाहेर आल्यावरही भुजबळांना सरकारशी लढताना मतदारसंघात विकासाची कामे म्हणावी तशी करताच आली नाहीत

 • Chhagan Bhujbal too will get this assembly very difficult

  येवला (जि. नाशिक) - सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विधानसभा मतदारसंघाचा इतिहास मोडीत काढणाऱ्या छगन भुजबळांसमोर चौथ्यांदा लढताना ‘संकट' गडद आहे. अडीच वर्षांनी तुरुंगाबाहेर आल्यावरही भुजबळांना सरकारशी लढताना मतदारसंघात विकासाची कामे म्हणावी तशी करताच आली नाहीत. त्यातच यंदा सेना भाजपची युती होऊ घातलेली असताना सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी तगडे ‘आव्हान' उभे केले आहे.


  सेनेकडून २०१४ मध्ये संभाजी पवारांनी भुजबळांना मोठे आव्हान दिले होते. भुजबळांकडून दुखावलेल्या माजी आमदार मारोतराव पवार यांनी आपल्या पुतण्या संभाजीला शिवसेनेत पाठवून चांगली मते मिळविली. सेनेत त्यावेळी तालुक्यातील ४ नेत्यांपैकी एकटेच मारोतराव होते. आता परिस्थिती याउलट आहे. नरेंद्र व किशोर दराडे हे बंधू सेनेत आले असून ‘आमदारकी’ची धुराही समर्थपणे वाहत आहेत. त्यामुळे सेनेचे पारडे आणखी जड झाले आहे. पंचायत समिती व नगरपरिषदेची सत्ताही भुजबळांच्या ताब्यातून सेनेने काढून घेतली अाहेत. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील ५ पैकी ३ जागा सेनेकडे आहेत. सेनेकडून गतवेळेस कडवी लढत दिलेल्या संभाजी पवारांनी ५ वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत तयारी केलेली आहे.


  शिवसेनेकडून पं.स. उपसभापती रुपचंद भागवत यांनी २ वर्षांपासून जोरात तयारी केली आहे. भुजबळांना ही निवडणूक जड होणार हे निश्चित आहे. फक्त सेनेतील उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण होऊन अंतर्गत गटबाजी होऊ शकते. ती जर सेनेने थांबविली नाही तर भुजबळांचे संकट फिकेही होऊ शकते.

  हे असू शकतात संभाव्य उमेदवार
  युतीत ही जागा सेनेकडे असून संभाजी पवार व रूपचंद भागवत हे इच्छुक आहेत. आघाडीत ही जागा २००४ पासून भुजबळांमुळे राष्ट्रवादीकडे जागा आहे. अॅड. माणिकराव शिंदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसकडून माजी आमदार जनार्दन पाटील यांच्या कन्या रश्मी पालवे या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून पक्षाला जागा न मिळाल्यास दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेऊ असे पालवे यांनी जाहीर केले आहे.

  पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम
  छगन भुजबळांनी मंत्री असताना राज्यातील पहिले तालुका सचिवालय, क्रीडा संकुल, नगरपरिषद, जिल्हा उपकेंद्र, पैठणी पर्यटन केंद्र, बोट क्लब, ट्राफिक पार्क या इमारती शहरात उभ्या केल्या. मात्र, तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या मांजरपाड्याचे ‘पाणी' काही आणू शकले नाहीत. त्यामुळे तालुक्यात शेती सिंचनाचा पाणी प्रश्न आजही कायम आहे.

Trending