आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांना लिहायचंय आत्मचरित्र; मुंबईचा महापौर ते मुंबईतील तुरुंगवास, आत्मचरित्राबद्दल प्रथमच केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - जात-धर्म-पंथ यापेक्षा आर्थिक कोंडी हा या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नोटबंंदी, बेरोजगारी, जीएसटी आणि शेतीची बिकट अवस्था यामुळे गांजलेले मतदार मोदी, भाजपविरोधात मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोहिते पाटलांच्या पक्षांतराआधी बारामती होस्टेलवर नेमकं काय झालं? प्रकाश आंबेडकर आघाडीपासून 'वंचित' का राहिले? भुजबळांचे अात्मचरित्र कधी येणार? याबाबत भुजबळ यांनी पहिल्यांदाच केलेला हा मोठा खुलासा. 

 

प्रश्न : तिहेरी तलाकच्या निर्णयाचा मुस्लिम मतांवर परिणाम होईल? 
भुजबळ
: त्यापेक्षा अखलाखला ज्या पद्धतीनं मारलं. घोड्यावर बसून वरात काढली म्हणून दलित समाजातील तरुणास जसंं ठेचून मारलं, यातून दलित-मुस्लिम घाबरलेले आहेत. त्यामुळे दलित आणि मुस्लिम माेदी सरकारच्या विरोधात आहेत. 

 

प्रश्न : तुम्ही आत्मचरित्र कधी लिहिणार? तुरुंगातील दिवस? 
भुजबळ :
लिहावंसं खूप वाटतं, पण वेळ मिळाला नाही. मिळाला तेव्हा जमलं नाही. पण कधीतरी निवृत्त झालो तर नक्कीच लिहीन. तुरुंगात असताना मी काही टिपणं काढली आहेत. फक्त तेवढंच नाही, शिवसेनेचा महापौर ते बेेळगाव कारवारपर्यंतची आंदोलनं, आमदारकी, इथली रामरथाची मिरवणूक, शिवसेना सोडणं, महसूलमंत्री होणं, सरकार जाणं, विरोधी पक्षनेता होणंं, घरावर झालेला हल्ला, गृहमंत्रिपदाचा राजीनामा, नाशिककरांचे प्रेम, महाराष्ट्र सदनच्या खोट्या केसमधली अटक... मुंबईतील तुरूंगवास.. सांगण्यासारखं भरपूर काही आहे... वेळ मिळाल्यावर नक्कीच लिहीन... 

 

प्रश्न : महाराष्ट्रात अाेबीसींची भूमिका महत्त्वाची का दिसत नाही? 
भुजबळ
: देशाच्या राजकारणात ओबीसींचा महत्त्वाचा रोल आहे. उत्तरेतील राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी समाजात जागृती नाही. मी खूप प्रयत्न केले; पण महाराष्ट्रातील ओबीसी समाज वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागला आहे. राजकीय व्यासपीठावर त्यांच्यात एकसंघपणा दिसत नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत ओबीसी आपल्या बाजूने असल्याचा भाजपचा दावा होता. त्या निवडणुकीत मोदींनीही शेवटच्या टप्प्यावर आपण तेली समाजाचे असल्याचे सांगितले. त्यांनाही शेवटी तेली कार्ड काढावं लागलं. त्यानंतर देशातील बराचसा ओबीसी समाज त्या बाजूला झुकला. 


प्रश्न : मोहिते पाटलांचं नेमकं काय बिनसलं? 
भुजबळ
: पवार साहेबांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यावर माेहिते पाटलांना लढण्याची सूचना केली हाेती; पण त्यांची मागणी मुलाला - रणजितसिंहला तिकीट मिळावं अशी होती. तेथील ६ विधानसभा मतदारसंंघांपैकी काही मतदारसंघांत रणजितसिंहला विरोध होता. तरीही त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, त्याआधीच रणजितसिंहांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. अजित पवारांनी विजयसिंहांशी बाेलण्याचे प्रयत्न केले; पण त्यांनी फाेनच बंद केल्याने नाइलाज झाला. 


प्रश्न : प्रकाश आंबेडकर आघाडीपासून 'वंचित' का राहिले? 
भुजबळ
: मी शेवटपर्यंत संवादासाठी प्रयत्न केला. चार जागांपर्यंत मी स्वत: त्यांना निरोप दिला. शेवटी सहा जागांच्या दिशेपर्यंत चर्चा आली होती. तसे लेखी पत्र त्यांना दिले. तरीही ते बारा आणि बावीस म्हणायला लागले तेव्हा आम्ही गप्प झालो. आरएसएसच्या घटनात्मक बंदीबद्दल प्रत्येक बैठकीत लेखी मागत होते. त्यासाठी कायदेतज्ज्ञांची उपसमिती केली. त्यांनी मसुदा तयार करण्याचे ठरले. त्यासही त्यांनी विरोध केला. खरं तर आमची आरएसएसविरोधी भूमिका उघड आहे. पण त्यांना आघाडी करायचीच नव्हती हेच यातून पुढे आलं. त्यांनी असं का केलंं याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल. त्यांच्या या भूमिकेमुळे ते काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फोडणार, भाजपची मते वाढवणार. 


प्रश्न : तुमचे जेलमध्ये असणे तुमच्या विरोधातील मुद्दा बनू शकतो, तुम्ही याकडे कसं बघता? 
भुजबळ
- आम्हाला अडकवलं हे आता सगळ्यांनाच कळलं आहे. मी बाहेर आल्यावर लोकांनी माझं स्वागत केलं. १० जूनच्या पुण्यातील त्या हल्लाबोल सभेतही माझं पहिलं जाहीर भाषण होतं. तोपर्यंत मलाही अंदाज येत नव्हता. मी तुरुंगात होताे तेव्हा लोक बोलत होते, भुजबळ संपले; पण शेवटी कुणी संपायचं की नाही हे लोक ठरवतात. त्यासाठी आतच जावं लागतं असं नाही. बाहेर असतानाही माणसंं संपतात. आणि जेलमध्ये असतानाही माणसं मोठी होतात हा या देशाचा इतिहास आहे. मी घाबरत नाही. मी लढणार, मी बोलणार. 


प्रश्न : सर्व आघाड्यांची बिघाडी का झाली? 
भुजबळ
: दुर्दैव आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे. पहिल्यांदाच लक्षात आलं होतं : देशपातळीवर ऐक्य होणार नाही. परंतु राज्यपातळीवर जेथे शक्य आहे तेथे पुढे जावे असेच ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी झाली. कर्नाटकात जेडीयू आणि काँग्रेस आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंनी पुढे जावे, उत्तरेत अखिलेश आणि मायावतींनी पुढे जावं, पश्चिम बंगालमध्ये ममतांनी पुढे राहावे. त्यानुसार बाकीच्यांनी त्यांना पाठबळ द्यावे असेच ठरले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...