आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत ‘माैना’ची शिक्षा, भुजबळांनी हातवारे करून गाजवले सभागृह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीलेश अमृतकर 

नाशिक - शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे, भाजीपाला विक्री करीत मुंबईत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले नेते छगन भुजबळ १९८५ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार झाले. या निवडणुकीनंतर चारच महिन्यांत ते महापाैरपदाच्या निवडणुकीतही विजयी झाले. शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसात भिनलेला असल्याने विराेधी बाकावरून भुजबळांनी विधानसभेत पहिल्याच एन्ट्रीत जाेरदार भाषणे सुरू केली, ती गाजलीही. वर्षभरानंतर भुजबळांनी माेक्याचे भूखंड तत्कालीन मंत्री आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या ‘कृपेने’ बिल्डरांनी कमी भावात खरेदी केल्याचा घाेटाळा उघडकीस आणला. या घाेटाळ्याकडे राज्याचे लक्ष वेधण्यासाठी भुजबळांनी स्वत: हातात ‘भूखंडाचे श्रीखंड काेणी खाल्ले?’ असा प्रश्न विचारणारे कापडी फलक गनिमी काव्याने साेबत घेऊन विधानसभेच्या सभागृहात प्रवेश केला. सभागृहाचे कामकाज सुरू हाेताच भुजबळांनी हा कापडी फलक दाेन्ही हाताने फडकवत जाेरदार घाेषणाबाजी केली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना धारेवर धरत भूखंडाच्या काेट्यवधींच्या घाेटाळ्याची चाैकशी करा, दाेषींवर गुन्हे दाखल करा, असा हल्लाबाेल सत्ताधाऱ्यांवर केला. त्या वेळी भुजबळांव्यतिरिक्त सभागृहात एकही विराेधक बाेलत नसल्याने पवार अवाक् झाले हाेते. आक्रमक भुजबळांपुढे सत्ताधारी मंत्र्यांची बाेलती बंद झाली हाेती. या गाेंधळामुळे विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज थांबवले. दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू हाेताच पुन्हा भुजबळांनी ‘भूखंडांचे श्रीखंड काेणी खाल्ले?’ असा प्रश्न उपस्थित करत सभागृह दणाणून साेडले. समज देऊनही भुजबळांचा गाेंधळ थांबत नसल्याने अखेर अध्यक्षांनी भुजबळांना दाेन दिवस विधानसभेत न बाेलण्याची शिक्षा सुनावली. भुजबळांनी सभागृहाचा आदेश मानला, मात्र ते शांत बसले नाहीत. हातवारे करत ते विधानसभेत भूखंडाचा प्रश्न मांडत राहिले. कागदपत्रांच्या प्रती उंचावून अध्यक्षांचे लक्ष वेधत राहिले. विराेधी बाकावरील काही आमदारही त्यांच्या मदतीला धावले हाेते, पुन्हा गाेंधळ वाढल्याने अध्यक्षांना कामकाज स्थगित करावे लागले.
 

शरद पवारही भारावले
भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी जाहीरपणे काैतुक करत त्यांना शाबासकी दिली हाेती. १९९१ मध्ये जेव्हा भुजबळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले तेव्हा याच विषयाचा उल्लेख शरद पवारांनीही केला हाेता. ‘भुजबळांचे भूखंडाचे श्रीखंड हे भाषण एेकून तेव्हाच ठरवले हाेते की, असा एक आमदार आपल्यासाेबत आला तर महाराष्ट्र पुन्हा जिंकून दाखवू,’ असे पवार तेव्हा म्हणाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...