आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छाजेड हल्ला प्रकरण : तपास करणाऱ्या काही पोलिसांची वरिष्ठांकडून नाकेबंदी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उद्योजक छाजेड यांच्यावरील हल्ल्याला गुरुवारी आठ दिवस उलटले तरी ठोस पुराव्यांअभावी तपास ठप्प आहे. शुक्रवारपर्यंत छाजेड कुटुंबीयांचे आप्त, नोकर, माळी अशा एकूण १६ पेक्षा जास्त जणांची पोलिसांनी चौकशी केली. परंतु त्यातूनही काही हाती लागले नाही. दुसरीकडे गच्चीवर सापडलेला रक्ताने माखलेला रॉड हाती येऊनही ठोस खुलासा होत नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणापासून दूर केले आहे. 

 

३० जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात पारस छाजेड यांच्यासह त्यांच्या पत्नी शशिकला व नातू पार्थ जखमी झाले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली अाहे. या घटनेनंतर पोलिसांनी सर्व दिशेने तपास सुरू केला. घराच्या चारही दिशेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज हस्तगत केले. परंतु हल्लेखोर कुठल्या मार्गाने आला व कुठेे गेला, हे स्पष्ट झालेच नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर शस्त्रासह घरातच असावा या भीतीने त्यांच्या सुनेने गॅलरीत येऊन आरडाओरड केली. स्थानिक जमा झाल्यानंतर त्यांना बांधकाम मजुरांच्या शिडीने गॅलरीतून उतरवण्यात आले होते. 

 

रॉडचा संदर्भ काय ? 
छाजेड यांच्या बंगल्याच्या छतावर पोलिसांना रक्ताने माखलेला लोखंडी रॉड आढळला. तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. परंतुु हा रॉड गच्चीवर कसा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. हल्लेखोराचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित होत नसताना या रॉडने तपासाला वेगळेच वळण मिळाले आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यादरम्यान, तपासात सहभागी काही कर्मचाऱ्यांना आता बाजूला करण्यात आले असून काही विशिष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांनी एकहाती तपास सुरू असल्याची चर्चा पोलिस विभागात होती. 

 

गत आठ दिवसांतील घटनाक्रम असा 
 ३० जानेवारी बुधवारी रात्री १०.३० ते १०.४५ च्या सुमारास पारस छाजेड कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला. 
 ३१ जानेवारी रोजी दिवसभर पोलिसांनी परिसरातील २० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले. पोलिस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 
 छाजेड यांच्यावर अॅपेक्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. 
 १ फेब्रुवारी रोजी छाजेड यांच्या बंगल्यावर रक्ताने माखलेला लोखंडी रॉड आढळला. 
 २ फेब्रुवारी रोजी पोलिस आयुक्तालयात शहरातील दुसऱ्या उद्योगपतीच्या पत्नीची जवळपास ४५ मिनिटे चौकशी. 
 ३ फेब्रुवारी रोजी परिचितांसह नोकर, माळी, इतर संबंधितांची सखोल चौकशी. 
 
पोलिस तपास सुरू आहे हे जाणवायलाही हवे ! 
शहरातील अत्यंत दाट आणि मध्य वस्तीत रात्री अवघ्या दहा, साडेदहा वाजेच्या सुमारास एका सधन कुटुंबावर प्राणघातक हल्ला होतो आणि आठवडा उलटून जातो तरी तपासात काहीही प्रगती होत नाही, ही या शहरासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. एक तर इतक्या दाट वस्तीत सारे विश्व जागे असताना असा हल्ला करण्याची हिंमत हल्लेखोरांना होते, हीच इथल्या पोलिस यंत्रणेची इभ्रत घालवणारी बाब आहे. सुदैवाने या गंभीर हल्ल्यात पारस छाजेड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्राणावर बेतली नाही. पण म्हणून या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. या घटनेतील अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत तरीही तपास यंत्रणेला आरोपींचा सुगावा लागू नये हे आश्चर्यकारक आहे. त्यातूनच मग या प्रकरणात पोलिसांवर खरोखरच काही दबाव येतो आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पूर्वी औरंगाबादशी संबंधित असलेल्या आणि आता मुंबईत असलेल्या एका अधिकाऱ्याकडून एक वेगळे दबावतंत्र सुरू असल्याची चर्चा औरंगाबादकर करू लागले आहेत. तसे काही असण्याची शक्यता कमीच असली तरी या प्रकरणाचे गूढ ज्या प्रकारे वाढवले जाते आहे त्यातून अशा चर्चांना आपोआपच खतपाणी मिळत जाते हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे. 


पोलिस आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत, असा याचा अर्थ नाही. प्रश्न आहे तो पोलिस तपास करीत आहेत, हे सर्वसामान्यांना दिसत नाही. 'केवळ न्याय होऊन चालत नाही, तो झाला आहे हे जाणवायला हवे,' असे एक प्रसिद्ध विधान आहे. पोलिस तपासाचेही तसेच आहे. केवळ पोलिस यंत्रणा असून भागत नाही, तर ती आहे हे सर्वसामान्यांना जाणवायला हवे असते. एखाद्या प्रकरणात पोलिसांना आरोपीचा सुगावा लागत नसेल तर त्यासंदर्भात माहिती देण्याचे जाहीर आवाहन पोलिसांकडून केले जाते. बरेचदा त्यासाठी बक्षीसही जाहीर केले जाते. प्रत्यक्ष पाहणाऱ्यांशी बोलून संशयित आरोपीचे स्केच तयार केले जाते. ते जाहीर केले जाते. कधी तरी अशा गंभीर प्रकरणात पोलिस माध्यमांसमोर येऊन जनतेला आश्वस्त करण्याचाही प्रयत्न करतात, असे अनुभव आहेत. या प्रकरणात मात्र असे काहीही होताना दिसत नाही आणि म्हणून औरंगाबादकरांची चिंता वाढत जाते आहे, हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. हे शहर उद्याेजकांचे शहर आहे. त्यामुळे जे छाजेड यांच्याबाबतीत घडले ते उद्या आपल्याबाबतीत तर घडणार नाही ना, अशी भीती इथल्या उद्योग विश्वात निर्माण झाली नसेल तरच नवल. 


छाजेड कुटुंबावर आलेल्या या संकटात 'दिव्य मराठी'सह सर्व औरंगाबादकर त्यांच्यासोबत आहेत. या हल्ल्यामुळे ज्या काही भीतीच्या सावटाखाली हे कुटुंब गेले असेल ती भीती समजण्यासारखी आहे. नव्हे, सारे औरंगाबादकर त्यासाठीच त्यांच्याबरोबर आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सर्व औरंगाबादकरांच्या वतीने आम्ही प्रार्थना करीत आहोत. आता त्यांनी या धक्क्यातून सावरावे आणि हल्लेखोराला तातडीने अटक व्हावी यासाठी जास्तीत जास्त माहिती पोलिसांना देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांना आम्ही करीत आहोत. 


भाष्य दीपक पटवे 
 

बातम्या आणखी आहेत...