आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ वर्षांपूर्वीच साेडले संताेषने घर; विश्वा बनून नक्षली कारवायांत सक्रिय, आता माओवाद्यांचा कमांडर असल्याची छत्तीसगड पाेलिसांची नाेंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - पुण्यातून ९ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला संतोष शेलार हा छत्तीसगडमध्ये माओवादी कमांडर झाल्याचे समाेर आले आहे. संतोषने नववीनंतर शिक्षण सोडून दिले होते. मात्र त्याला चित्रकलेचे उत्तम ज्ञान आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये त्याने ‘एका प्रदर्शनाला मदत करण्यासाठी मुंबईला जात आहे’ असेच कारण सांगून घर सोडले होते. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार खडक पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, छत्तीसगड पोलिसांनी ‘अॅक्टिव्ह माओईस्ट’ म्हणून जी यादी तयार केली त्यात संतोष ऊर्फ विश्वा याचा उल्लेख ‘तांडा एरिया कमिटी कमांडर’ म्हणून नोंदवला गेला आहे. या यादीत विश्वा हा डेप्युटी कमांडर असून, त्याच्याजवळ ‘पॉइंट थ्री झीरो थ्री’ रायफल असल्याचे म्हटले आहे. नक्षलवादी चळवळीत शेलार हा प्लाटून नंबर ५६ किंवा प्लाटून बीचा भाग असून आणखी एक बेपत्ता तरुण प्रशांत कांबळे हा माओवाद्यांच्या टेक्निकल टीमचा सदस्य असल्याचे पुढे येत आहे.


कबीर मंचचा कार्यकर्ता?
पुण्यात कबीर कला मंचचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून संतोष काम करत असल्याची माहितीही पुढे आली आहे. संतोषसोबत पुण्याच्या ताडीवाला रोड झोपडपट्टी येथील प्रशांत कांबळे हाही बेपत्ता झाला असून त्यानेही माओवादी चळवळीत सहभाग घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 


शहरी रिक्रुटमेंटचा प्रकार
शेलार, कांबळे आणि अन्य काही उदाहरणांवरून हे लक्षात येत आहे की समाजविघातक चळवळीवाल्यांनी शहरी भागातून रिक्रुटमेंटवर लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षित पण अर्धवट वयातील युवकांना वरवरची प्रलोभने दाखवून पटकन प्रभावाखाली आणता येते. तोच मार्ग या संघटनांनी स्वीकारल्याचे समोर येत आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, चंद्रपूर येथून अशी तरुणांची ‘भरती’ नक्षलवादी गटांनी केली आहे. 


तेलतुंबडेच्या संपर्कात
२०११ च्या मध्यात शेलार आणि कांबळे यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने ओजेला सोनटक्के व अन्य काही माओवाद्यांसह ताब्यात घेतल्याची माहिती आहे. भूमिगत नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे व अंजली सोनटक्के यांच्याशी संपर्कात येऊन शेलार आणि कांबळे नक्षलवादी चळवळीत सामील झाल्याचे बोलले जात आहे. 

 

 चित्रे काढताे म्हणून पेंटर नावाने चळवळीत अाेळख
२०१४ च्या मे महिन्यात गडचिरोली पोलिसांनी पुराडा ठाण्याच्या क्षेत्रात जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकींत काही कागदपत्रे, वह्या, वॉकीटॉकी सेट मिळाले होते. त्यातील एका वहीत विश्वा या नावाने स्वाक्षरी होती. त्यात काही चित्रे, आरेखने विश्वा याने केल्याचा उल्लेख होता. संताेष शेलार हाच विश्वा आहे. तो चित्रे चांगली काढतो म्हणून त्याला पेंटर असेही म्हटले जाते. प्रशांत कांबळे याला मधुकर आणि लॅपटॉप अशी नावे आहेत. कांबळे हा इलेक्ट्रिकल वस्तू उत्तम रीतीने हँडल करत असल्याची माहिती आहे.
 

 

पालक, शिक्षकांनी मुलांवर लक्ष ठेवावे : रवींद्र कदम 
नक्षलवादविरोधी कारवाई प्रमुख रवींद्र कदम यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, ‘वाचकांना, पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही, मी सांगू इच्छितो की कुठल्याही संघटनेत सामील होण्याआधी विवेक जागा ठेवा. विशिष्ट संघटनांची विचारधारा काय आहे, व्यक्ती कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्या योजना काय आहेत, यांचा नेमका अंदाज घेण्यापूर्वीच त्यांच्या प्रभावाखाली जाऊ नका. पालकांनी आणि शिक्षकांनीही आपली मुले, विद्यार्थी कुणासोबत वावरतात, सोशल मीडियावर कसे व्यक्त होतात, त्यांचे सहकारी, मित्र कोण आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वरवर वेगळ्या नावाने वावरणारे घटक प्रत्यक्षात समाजविघातक कारवायांत सहभागी असू शकतात. अननुभवी मुले त्यांच्या संपर्कात येऊन चुकीच्या दिशेने जाऊ शकतात, याचे भान बाळगले पाहिजे.’