INX / मनी लाँडरिंग प्रकरणात चिदंबरम यांना  26 पर्यंत अटक नको : सुप्रीम कोर्ट

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत अटक करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे.

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 24,2019 08:54:00 AM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियाशी संबंधित बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत अटक करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. मात्र, तत्पूर्वीच सीबीआयने चिदंबरम यांना अटक करून २६ ऑगस्टपर्यंत कोठडी मिळवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्देशांचा त्यावर परिणाम होणार नाही. सीबीआयकडून अटक आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) दाखल मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित अशा दोन्ही याचिकांवर सोमवारी सुनावणी होईल. न्या. आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले की, मनी लाँडरिंग प्रकरणात सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. चिदंबरम यांनाही ईडीने सोमवारपर्यंत अटक करू नये. पीठ निकालपत्र तयार करत असताना सीबीआयकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीलबंद लिफाफा कोर्टासमोर ठेवत म्हटले की, िदलासा देण्यापूर्वी ही कागदपत्रे पाहावीत. न्या. भानुमती यांनी लिफाफा उघडून पाहण्यास नकार देत, त्या मेहता यांना म्हणाल्या, तो सोमवारी सादर करा. गोपनीय कागदपत्रे अशी दिली जात नाहीत.


एअरसेल-मॅक्सिस -३ सप्टेंबरपर्यंत दिलासा : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने चिदंबरम यांच्या अटकेवरील बंदी ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणात चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

X
COMMENT