आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्यांमुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावे व उजवे हात समजले जाणारेच महिला व मुलींचे अपहरण कसे करायचे हे जाहीर कार्यक्रमात सांगतात. विशेष म्हणजे अशांना क्लिनचीट देण्यात येते. त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ मिळत आहे, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. 


अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पीडित मुलीची भेट घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे नगरला आल्या होत्या. रुग्णालयात जाऊन त्यांनी मुलीची भेट घेतली. एका महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिली. नंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात महिलांना आरक्षण मिळाले, परंतु संरक्षण अद्याप मिळालेले नाही. त्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज आहे, त्यादृष्टीने शिवसेना प्रयत्न करत आहे. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी येत्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षपाती भूमिका सोडली पाहिजे. वाल्याचे वाल्मिकी नव्हे, तर वाल्मिकीचा वाल्या होऊन राज्यात धुमाकुळ घालणारे मुली व महिलांना कसे पळवायचे, हे जाहीर कार्यक्रमातून सांगणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून पाठबळ मिळत आहे. अशा प्रवृत्तींना पाठीशी न घालता त्यांना वेळीच ठेचण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे अाहे. 


मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही डॉ. गोऱ्हे यांनी टीका केली. मुंडे केवळ गोड बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमला भाजप पोसत असल्याचा आरोपही डॉ. गोऱ्हे यांनी केला. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी पद्मशाली ज्ञात समाज पंचकमेटीच्या वतीने संजय वल्लाकट्टी यांनी डॉ. गोऱ्हे यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. 


अत्याचारांमध्ये वाढ 
अत्याचारांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. यासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून निधी देणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या वतीने पीडित मुलीला अभ्यासासाठी शैक्षणिक साहित्य पुरवले जाणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. 


शिवसैनिकांनी कामाला लागावे 
आमदार डॉ. गोऱ्हे यांनी आगामी महापालिका निवडणुकीबाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिकेवर पुन्हा भगवा फडकणारच, असा दावाही त्यांनी केला. युतीबाबत पक्षपातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेनेची मात्र स्वबळावर लढण्याची तयारी झाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले. 


नगरच्या घटना कलंिकत करणाऱ्या 
नगरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणे, हेच या गंभीर प्रश्नाचे उत्तर अाहे. नगर जिल्ह्यात महिला व मुलींवर अत्याचार या घटना कलंकित करणाऱ्या आहेत. हिंजवडी येथे दोन मुलींवर अत्याचार झाले, त्यातील एक दगावली. नगरच्या घटनेत आरोपीच्या आईनेच मदत केली ही गंभीर बाब असल्याचेही आमदार डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...