आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनाचा पैसा गेला कुठे? राज ठाकरे; एकमेकांची जिरवण्यातच सिंचन रखडले: मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र झाला. तेव्हापासून अाजपर्यंतच्या सरकारांनी राज्यातील पाणीप्रश्न साेडवण्यासाठी केले काय?’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ‘पाणी फाउंडेशन’च्या कार्यक्रमात श्रोत्यांमध्ये बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री अजित पवार यांना उद्देशून केला. ‘अगोदरचे सरकार इथे बसले आहे. आताचे बसले आहे,’ असे म्हणत ठाकरेंनी पुढचा प्रश्न केला,  १९६० ते २०१८ इतक्या वर्षांचा सिंचनाचा पैसा गेला कुठे? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला जागरूक करण्याचे काम आमिर खानवर सोपवणार असाल तर सरकार काय करते?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार या दोघांनीही त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.  


प्रसिद्ध अभिनेते अामिर खान यांच्या ‘पाणी फाउंडेशन’तर्फे घेण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप- २०१८’ या स्पर्धेतील विजेत्या गावांना बहारदार सोहळ्यात रविवारी पुण्यात गौरवण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित नेत्यांमध्ये सवाल-जवाब रंगले. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, फाउंडेशनचे अामिर खान, त्यांच्या पत्नी किरण राव, सत्यजित भटकळ आदीही या वेळी उपस्थित होते. 


सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना राज ठाकरे म्हणाले, ‘आजपर्यंत सिंचन खात्यात मुरलेले पाणी बाहेर आले असते तरी महाराष्ट्राची पाणीपातळी कधीच उंचावली असती. पाणी फाउंडेशनच्या कार्यात सरकारी अधिकारी काम करत असतील तर ते सरकारच्या कामात काम का करत नाहीत?’ असा टोला त्यांनी लगावला. अामिर खान कधीच कोणतेच अवॉर्ड घेत नाही. ‘मॅगसेसे’ मिळेल त्या दिवशी मात्र तू तो नक्की घे,’ असे अामिर खानला सांगतानाच पुढच्या वर्षी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करायला येईन, असेही राज यांनी सांगितले. मुंबईत विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे कारण देऊन खोचक प्रश्न, टीका, सल्ला, आश्वासन यांनी भरलेले मनोगत संपवून राज ठाकरे कार्यक्रमातून निघून गेले. अर्थात सर्वाधिक टाळ्या राज ठाकरेंनीच मिळवल्या. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अजित पवारांनी तिखट उत्तर दिले. ‘काही लोक येतात. बोलघेवड्यासारखे बोलून निघून जातात. त्यांना काही करायचेही नसते. दाखवायचेही नसते. सभा जिंकायची असते. चालले निघून. असे होऊन चालत नसते. अधिक खोलात जात नाही,’ असे म्हणून पवारांनी राज ठाकरेंचा विषय संपवला.   


‘माझे मित्र राज ठाकरे यांना छोटासा प्रश्न पडला,’ अशी सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, ‘याचा दोष नागरिकांचा नाही. आपण घोषणा दिली होती ‘पाणी अडवा पाणी जिरवा’. पण ‘एकमेकांना अडवा, एकमेकांची जिरवा’ असे झाल्याने जलसंधारण झाले नाही. परंतु, गट-तट, पक्ष, जात, धर्म हे सगळे विसरून सारा गाव एकत्र येत नाही तोवर गाव पाणीदार होत नाही. राज यांच्या छोट्या प्रश्नाचे हेच छोटे उत्तर आहे.’  


देवेंद्र-अजितदादांचे एकमत  
‘भूगर्भातली पाणीपातळी वाढली की शेतकरी जास्त पाणी लागणारी ऊस, केळी यासारखी पिके घेतात. त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार करायचा तर पीक पद्धतीबद्दलही विचार करावाच लागेल,’ असे अजित पवार यांनी निक्षून सांगितले. त्याला दुजोरा देत मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाणीपातळी वाढल्यावर अतिउपसा चालू केला तर पुन्हा दुष्काळाकडे जावे लागेल. पाण्याच्या अनिर्बंध वापराबद्दलच्या जुन्या चुका सुधारल्या नाहीत, पीक पद्धतीत बदल केला नाही तर दुष्काळापासून वाचणार नाही.’

 

बातम्या आणखी आहेत...