आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारने रफाल खरेदीतील मोठी दलाली संपवून देशाचा पैसा वाचवला; मुख्यमंत्र्यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोदी सरकारने रफाल विमान खरेदीतील दलालांची सक्ती संपवून देशाचा पैसा वाचवला. या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी केली तर विरोधकच तोंडावर पडतील, अशा  शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रफाल खरेदीबाबत केंद्र सरकारवर होत असलेल्या आरोपांचे खंडन केले.

 

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देत काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्यासोबत एका व्यासपीठावर यावे आणि त्यांनी १५  वर्षांत काय केले आणि आम्ही ४ वर्षांहून कमी कालावधीत काय केले, हे आकडेवारीसह सांगू आणि  काँग्रेस-राष्ट्रवादीने इतकी वर्ष महाराष्ट्राची कशी फसवणूक केली, हे एकदा जनतेला कळू द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.  महागठबंधनच नव्हे, तर महामहागठबंधन जरी झाले तरी केंद्र आणि राज्यात भाजपलाच जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

भाजपच्या दोनदिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांनी केला. या वेळी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, पीयूष गोयल, हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका  केली. फडणवीस म्हणाले,   विरोधी पक्षाकडे बोलण्यास काहीही नाही म्हणून ते सतत टीका करत राहतात. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी तुम्ही प्रत्येकाशी संवाद साधा आणि त्यांना खरी माहिती द्या. राज्य सरकार खूप चांगले काम करत असून ३० हजार किमीपेक्षा अधिकचे रस्ते आपल्या सरकारने ग्रामीण भागात तयार केले आहेत. कोणताही सिंचन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी आवश्यक जागेचे अधिग्रहण करण्याचे धोरण सरकारने पत्करले. त्यामुळे प्रकल्पांच्या किमती वाढणार नाहीत, हे सरकारने सुनिश्चित केले. सिंचनासाठी ३० हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले आणि आणखी ३० हजार कोटी केंद्राकडे मागितले आहेत. २०१४ पर्यंत केवळ ३२  लाख हेक्टर इतके सिंचन होते. आपल्या सरकारने अवघ्या ४ वर्षांत १३ लाख हेक्टरची त्यात भर घातली असेही मुख्यमंत्री म्हणाले.   

 

शेतक ऱ्यांना १६ हजार कोटी दिले  
मुख्यमंत्र्यांनी या वेळी राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामांचा आढावा दिला. ४ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी १६ हजार कोटी रुपये देण्यात आले. तसेच या ४ वर्षांत ८२०० कोटी रुपयांचे अन्नधान्य खरेदी केले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुशासनाबाबत, विकासाबाबत भाजपशी स्पर्धा करूच शकत नाही. त्यामुळे फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित करण्याचे काम त्यांनी सुरू केले असल्याचेही त्यांनी म्हटले. 

 

लाेकांचे मत विकासालाच  
मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट असे आपले संवादाचे माध्यम असून गोरगरिबांसाठी काम करणे, हे आपले कर्तव्य आहे. विकासापासून लोकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. महागठबंधन होवो अथवा महामहागठबंधन, आपल्याला त्याची पर्वा नाही. लोकांचे मत विकासाला असेल, ते भाजपलाच असेल, असेही त्यांनी म्हटले.

 

बातम्या आणखी आहेत...