आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी 41 मिनिटांतच गुंडाळला पहिला पाहणी दाैरा, अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, तातडीने मदत देण्याची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा राज्यातील पहिला पाहणी दाैरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, ३ नोव्हेंबरला अकाेला तालुक्यातील म्हैसपूर (फाटा), लाखनवाडा (कापशी राेड) व िचखलगाव येथे केला. येथील पाहणी दाैरा त्यांंनी ४१ मिनिटांत गुंडाळला. त्यांनी रस्त्याच्या लगतच असलेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. सकाळी ११.३० वाजता लाखनवाडा येथून प्रत्यक्ष सुरू झालेला पाहणी दाैरा दुपारी १२.११ वाजता म्हैसपूर फाटा येथे संपला. या वेळी शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने उद्ध्वस्त झालाे असून तातडीने भरीव मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली.


अतिवृष्टीमुळे शेतातून उत्पन्नच हाेणार नसल्याने पुढील शेती कशी करावी आणि संसाराचा गाडा कसा हाकावा, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे यंदा झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दौरा केला. अकाेला तालुक्यातील काेणत्या तालुक्यातील, काेणत्या गावातील शेतकऱ्यांशी भेटणार आहेत, काेणाशी संवाद साधणार आहेत, याचे नियाेजनच करण्यात आले हाेते. या नियाेजनासुनार त्यांनी पिकांची पाहणी करत आधीच बाेलावून ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दाैऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांच्यासह भाजप, शिवसेनेचे आमदार, अधिकारी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

म्हैसपूर फाट्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या
अकाेला : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शनिवारी तालुक्यातील म्हैसपूर (फाटा) येथे शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र, मुख्यमंत्र्यांना त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधणे शक्य झाले नाही आणि त्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. त्यामुळे हा ताफा गेल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी फाट्यावरच ठिय्या दिला. नंतर या शेतकऱ्यांची आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजप लाेकप्रतिनिधींना समजूत काढली. काही वेळाने शेतकरी तेथून उठल्याने रस्ता वाहतुकीसाठी माेकळा झाला.


शनिवारी सकाळी परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी अकाेला व मूर्तिजापूर तालुक्यातील काही गावांची पाहणी केल्यानंतर रात्री मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याचा कार्यक्रम येऊन धडकला. अकाेला शहराकडे निघालेला मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी म्हैसपूर फाट्यावर थांबवला. त्यांनी अतिवृष्टीने खराब झालेले साेयाबीन, कपाशी आदी पिके हातात घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजप नेत्यांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
'चित्रीकरण करू नका
'
शेतकऱ्यांशी आ. रणधीर सावरकर व भाजप नेत्यांनी संवाद साधला. संतप्त शेतकरी भावना व्यक्त करत हाेते. आ. सावरकरही त्यांची समजूत काढत हाेते. त्याच वेळी पत्रकार माेबाइल फाेनद्वारे चित्रीकरण करत हाेते. चित्रीकरण करू नका, असे आ. सावरकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा संताप
ताफा गेल्यावर म्हैसपूर फाट्यावरच शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. त्यांच्याशी अामदार रणधीर सावकर व अन्य भाजप नेत्यांनी संवाद साधला. भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांना रस्त्याच्या बाजूला हाेऊन चर्चा करू, असे सांगितले. काही वेळाने ते बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले. शेतकऱ्यांनीही तुम्ही आमच्या हिताचेच निर्णय घ्याल, असा आशावाद व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी सुनावले
या दाैऱ्यात भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, नेते सहभागी झाले हाेते. पाेलिसांनी येथे गर्दी करू नका, असे शेतकऱ्यांना सांगितले. यावर शेतकऱ्यांनी आधी आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटू द्या; आमच्या समस्या, नुकसानीची माहिती सांगू द्या, अशी उद्विग्नता व्यक्त केली.

औरंगाबाद : 'अपुरा पाऊस अन‌् कडक ऊन यामुळे गतवर्षी या रानात आमच्या पायाला भेगा पडल्या होत्या. आता रानही तेच आहे, परंतु गेल्या १५ दिवसांपासून येथे फिरताना त्याच पायाच्या बोटांना चिखल्या झाल्या आहेत, हाती मात्र काहीच नाही. सहा वर्षांपासून डोळ्यासमोर पीक वाळताना बघताेय. यंदा पाण्यात वाहून जाताना बघण्याची वेळ आलीय. साहेब थकलोय आता...' अशा शब्दांत अाैरंगाबाद जिल्ह्यातील गारज (ता. वैजापूर) व कानडगाव (ता. कन्नड) येथील शेतकऱ्यांनी पाहणी दाैऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर कैफियत मांडली. त्यावर 'कितीही संकटे आले तरी घाबरायचे नाही. लढाई ही आपल्या रक्तात आहे, त्यामुळे कोणी आत्महत्येचा विचार करू नये, यातून मार्ग निघेल. मी तुम्हाला धीर द्यायला आलोय..' अशा शब्दात ठाकरेंनी त्यांना धीर दिला.


उद्धव ठाकरे यांनी रविवारी अाैरंगाबाद जिल्ह्यातील दाेन गावांचा दाैरा करून तेथे पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सकाळी ११ वाजता ठाकरे अाैरंगाबादेत आले, नंतर ११.५० वाजता कानडगाव येथे पोहोचले. मक्याच्या कणसांना आलेले दोन फुटांचे कोंब शेतकऱ्यांनी ठाकरे यांना दाखवले. हीच परिस्थिती पुढे गारज येथे होती. यंदा पुरेसा पाऊस असल्याने मका, सोयाबीनसह सर्वच खरीप पिके व्यवस्थित आली हाेती. परंतु परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले, अशा व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या डाेळ्यात अश्रू तरळले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे या वेळी उपस्थित हाेते. 'आम्ही विमा काढलाय, पण भरपाई मिळेल की नाही, याची शाश्वती नाही,' असे शेतकरी बाबासाहेब मोगल म्हणाले. तर अस्मानी संकटाशी आम्ही लढतोय, पण या सुलतानीचे काय, अशी खंत ज्येष्ठ शेतकरी येडुबा सोनवणी यांनी व्यक्त केली.

बँकेने पाठवलेल्या नोटिसा फाडून फेका
'नुकसानीचे सोडा, आम्हाला बँकेने कर्जवसुलीची नोटीस पाठवली आहे, काय करावे ते सांगा?' असा सवाल रुस्तुम भोसले, शिवाजी थेटे या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना केला. त्यावर 'कर्जवसुलीच्या नोटिसा फाडून फेका, जाळून टाका. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे पुढे काय करायचे ते पाहतील. भरपाई मिळत नसेल तर तुम्ही अंबादास यांच्याशी संपर्क साधा,' असे ठाकरेंनी सांगितले. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, मी येथे नुकसानीची पाहणी करण्याचे नाटक करण्यासाठी आलेलो नाही, तुम्हाला तुमचा सर्व हक्क मिळेल आणि तो मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत नव्हे तर तुमच्या पुढेच लढू,' असा शब्द ठाकरेंनी दिला.

आदित्य ठाकरे आज नाशिक दाैऱ्यावर
हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने राज्यात पिकांची नासधूस झाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी साेमवारी (४ नाेव्हेंबर) युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून थेट बांधावर जात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आदित्य साेमवारी सकाळी ९ वाजता ओझर विमानतळावर पाेहाेचणार असून सकाळी ९.३० वाजता दिंडोरी, १०.४५ वाजता चांदवड, १२ वाजता सटाणा, १.१५ वाजता मालेगाव, २.१५ वाजता मनमाड आणि नांंदगाव, दुपारी ३ वाजता टाकळी, येवला, लासलगाव, ४.१५ वाजता निफाड येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता नाशिक येथे विभागीय आयुक्तालयात अधिकारी व लोकप्रतिनिधींसमवेत भेट घेणार आहेत.

'...बोलू द्या त्यांना' 
उद्धव ठाकरेंसमाेर काहींना बोलण्याची संधी मिळाली तर अनेकांना ऐनवेळी बोलता आले नाही, मात्र 'साहेब माझे म्हणणे ऐका' अशी साद जेव्हा घालण्यात आली तेव्हा ठाकरेंनीही 'अरे बोलू द्या त्यांना' असे म्हणत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. तुमच्याकडून काही नको, रब्बी चांगली होईल एवढी अपेक्षा आहे, पण विमा मिळाला तर बरे होईल, बँकांना कर्जवसुली थांबवण्याचे सांगा, अशी विनंती काही शेतकऱ्यांनी केली.