Tribute / दुष्काळाची काळजी करू नका, वेळ आली तर राज्याची तिजोरी रिकामी करू : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी जनतेला शब्द

पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच या मंचावर असतील - पंकजा मुंडेंना विश्वास 

प्रतिनिधी

Jun 04,2019 06:30:00 AM IST

परळी - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न पूर्ण करू. दुष्काळाची कोणीही काळजी करू नये. त्यासाठी वेळ आली तर राज्याची तिजोरी रिकामी करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे जनतेला दिला.


परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगडावर सोमवारी दुपारी एक वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतfदिनी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यातून मुंडे समर्थकांची गर्दी उसळली होती. रोजगार मेळावा व मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस आठवणींचे काहूर माजवणारा आहे. आम्हाला ज्या व्यक्तीकडून काही शिकायला मिळाले त्या मुंडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना मनात अनेक प्रकारच्या भावना काहूर माजवतात. ते आपल्यात नाहीत, हे दु:ख मनात जाणवतेच. त्यांचे व्यक्तिमत्त्व एवढे प्रचंड होते की ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात ते आले त्या माणसात नेतृत्व करण्याची क्षमता तयार व्हायची. म्हणूनच राज्यातील सामान्य माणसाला संघर्षाबरोबरच नेतृत्व करण्याची शिकवण मुंडे साहेबांनी दिली.


मुंडे आणि महाजन यांच्या पायाभरणीमुळेच राज्यात भाजपला यश मिळवता आले, असेही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज मुंडे आपल्यात नसले तरी लोकसभेतील हे यश पाहून आपल्याला साहेब आशीर्वाद देत असतील. मुंडे साहेब परीस होते. त्यांनी ज्यांना हात लावला ते मोठे नेते झाले. मोदींच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात भाजपचे ४८ पैकी ४१ खासदार येऊ शकले. त्यांचे नेतृत्व पाहून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. याचे श्रेय मुंडे साहेबांनाही आहे. महाराष्ट्रात मुंडेंनी संघर्षातून राजकीय क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले होते. मराठवाड्यातील आठही जागा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पुढील निवडणुकीत पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंकजा मुंडेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
काही नेते स्वत:ला राजा महाराजा, जाणता राजा म्हणून घेतात. पण याच लोकांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांबद्दल जातिवाचक उद्गार काढले होते. पण अशा लोकांना मुख्यमंत्री पुरून उरले, असे म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.

लोकसभेची एक जागा पुढच्या वेळी जिंकू
मराठवाड्यातून आठच्या आठ खासदार निवडून आणण्याचे गोपीनाथरावांचे स्वप्न होते. आम्ही या वेळी फक्त एक जागा चार हजारांच्या फरकाने गमावली अाहे. ही जागाही आम्ही पुढच्या वेळी जिंकू आणि गोपीनाथरावांचेे या वेळी राहिलेले स्वप्न पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच या मंचावर असतील
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबाबतच्या चर्चेला विराम देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर होत असलेल्या सर्व कार्यक्रमांना आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहिलेली असून पुढील वर्षी होणाऱ्या कार्यक्रमासही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून उपस्थिती राहणार असून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून मी शब्द देत आहे. फडणवीस सरकारच्या कार्यामुळे महाराष्ट्रातही सत्ता काबीज करू असा विश्‍वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

X
COMMENT