आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- 'मराठवाड्याला मागासलेपणापासून मुक्ती देत समृद्धी आणि विकास करण्यासाठी सरकार पावले टाकत अाहे,' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात दिली.
अाैरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर ध्वजारोहण केले. ते म्हणाले, 'निझाम राजवटीत रझाकारांच्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा उभारला. या लढ्याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. आता मराठवाड्याला विकासाची भूक आहे. विकासासाठी अनेक निर्णय झाले. सिंचन, हक्काचे पाणी, बळीराजा संजीवनी योजना, जलयुक्त शिवारमध्ये ६० हजार हेक्टर क्षेत्रावर संरक्षक सिंचन केले. मराठवाड्यात ५ कोटी वृक्ष लागवड दुष्काळमुक्तीचे पाऊल ठरेल. उद्योगात औरंगाबाद- जालना मॅग्नेट ठरणार असून डीएमआयसीच्या ऑरिक सिटीत ११ हजार कोटींची गुंतवणूक होऊन ३ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.'
मराठवाड्यात सर्वात मोठी वॉटरग्रीड तयार करून १४ प्रकल्पांतून पाणी अाणणार
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होणार आहे. उद्योगवाढीसाठी या भागातील विजेचे दर कमी केले. मराठवाड्यात सर्वात मोठी वॉटरग्रीड तयार करून १४ प्रकल्पांचे पाणी एकत्रित करून पाइपलाइनद्वारे पिण्यासाठी दिले जाणार आहे. औरंगाबादला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी अापण प्रयत्नशील अाहाेत, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
धनगर आरक्षणासाठी घोषणाबाजीचा प्रयत्न
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरित लागू कराव्यात ही मागणी घेऊन आलेल्या शिष्टमंडळाने सकाळी साडेआठच्या सुमारास विमानतळावर मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण दाखवून त्यांना भेट नाकारली. त्यामुळे ते ध्वजाराेहणाच्या ठिकाणी गेले. कपाळाला भंडारा आणि गळ्यात पिवळे उपरणे घातले असल्यामुळे पोलिसांना आंदोलक तत्काळ लक्षात आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांविराेधात घाेषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी त्यांना तत्काळ थांबवले. अखेर दुपारी हे शिष्टमंडळ विमानतळावर फडणवीसांना भेटले व आपल्या मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोघम आश्वासने दिल्याचे अांदाेलकांनी या वेळी सांगितले.
दोन पुस्तकांचे प्रकाशन
मराठवाड्यातील विविध योजनांचा आणि उपक्रमांचा समावेश असणाऱ्या विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या 'अग्रेसर मराठवाडा' पुस्तिकेचे आणि प्रा.अ. मा. पहाडे यांनी लिहिल्या 'हैदराबाद मुक्तिसंग्रामातील माणिक' या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.