आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री ठाकरेंचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर, बॅटरी दिल्लीत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : सध्या राज्यात असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर आहे आणि त्याची बॅटरी दिल्लीत आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लगावला.

नागपुरात भाजपची शहर आणि ग्रामीण अध्यक्षांची निवडणूक आणि ज्येष्ठ नेते आनंदराव ठवरे यांचा सत्कार या कार्यक्रमांमध्ये बोलताना फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. कार्यकर्त्यांना आवाहन करून फडणवीस म्हणाले, राज्यातील सरकार किती दिवस चालेल, याची पर्वा न करता विरोधी पक्षात बसून जनतेसाठी सरकारवर रोज हल्ले करायचे आहेत. गरज पडल्यास भाजप त्यासाठी रस्त्यावरही उतरेल.

आम्ही रंग बदलला नाही, असे ते सांगतात. मात्र, आम्हाला रंग बदललेला दिसत आहे. रंग बदलला नसेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर मुद्द्यावर सोबत राहून दाखवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.

सत्ता गेली तर सर्वच गेले, असे कार्यकर्त्यांना वाटते. एखाद्या निवडणुकीत मागे राहिले तर भाजप कमजोर झाल्याचे समजता कामा नये. नागपूर जिल्ह्यात भाजपची ताकद कायम आहे. कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी या वेळी केले.

मध्य प्रदेशातच फोन टॅप

आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याचे वा विरोधी पक्षनेत्याचे फोन टॅप करण्याचेे आदेश देण्यात आलेले नव्हते. मध्य प्रदेशातच भाजप नेत्यांचे फोन टॅप झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. या आरोपांमधील तथ्य केंद्र सरकार वा मध्य प्रदेश सरकार शोधेल. मात्र, महाराष्ट्रात आम्ही कोणाचेही फोन टॅप केले नाहीत. जे यासंदर्भात तक्रार करीत आहेत, त्यांची विश्वासार्हता जनतेला माहिती आहे. त्यामुळे या आरोपांची चौकशी करून अहवाल जनतेपुढे आणावा, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या राजवटीत भाजप आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅप होत होते. ही बाब उघडही झाली होती, असेही ते म्हणाले.

फाेन टॅपिंगची चाैकशी करून राज्य सरकारने निष्कर्ष काढावा : पाटील


पुणे : भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर विरोधकांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा आरोप होत अाहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी हे आरोप फेटाळून लावले अाहेत. राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटते. रोज नवीन काहीतरी बाहेर काढतात. मात्र जे अाराेप केले जातात त्याचा शोध लावत नाहीत. सरकारने चौकशी करून अहवाल तयार करून निष्कर्ष काढावा, असे मत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना शनिवारी केले.


पाटील म्हणाले, सरकार कोरेगाव भीमाबाबत रोज दिशाभूल करणारे नवीनच वेगळे प्रकरण बाहेर काढण्यात येत आहे. हा कल्पनाशक्तीचा विलास असून यामुळे जनता बातम्या वाचणे बंद करेल. आमच्यावर आरोप केलेल्या प्रकरणाची चौकशी करून सरकारने अहवाल लवकर आणावा. सरकारने फक्त वातावरणनिर्मिती करू नये तर दोषींवर कारवाई करावी. माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विधानावर बोलताना पाटील म्हणाले, राज्यमंत्र्यांनाही अधिकार असतात. मात्र, त्यांचे विधान राजकीय सोय असेल. सरकारने अजून एखादी यादी काढावी. मात्र, वेळेत चौकशी करावी. याप्रकरणी लवकर चौकशी सुरू करा आणि दोषींवर कारवाई करा, असे आव्हान त्यांनी दिले. कोरेगाव भीमाप्रकरणी एनआयए तपासावर बोलताना हा पण कल्पनाविलास आहे, असे ते म्हणाले.

राज यांना परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी लागेल

केंद्राला एखाद्या महत्त्वपूर्ण गुन्ह्याच्या चौकशीचा पूर्ण अधिकार असून यात चुकीचे काही नाही. तर राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना, राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका स्वागतार्ह आहे. भविष्यात मनसेबरोबर भाजप एकत्र येईल का नाही हे भविष्य ठरवेल. मात्र, त्यांना परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी लागेल, असेही मत चंद्रकांत पाटलांनी मांडले.

 

बातम्या आणखी आहेत...