आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील नाणार आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे अखेरीस मागे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या आरे काॅलनीतील मेट्रो कार शेड आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प आंदोलकांवरील  सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार परिसरात दुबईच्या आराम्को कंपनीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार होता. यामध्ये १६ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. मात्र, शिवसेनेने या प्रकल्पास विरोध केला होता.नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने तेथे लढा उभारला होता. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पस्थळी जाऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. नाणार आंदोलनात २३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याचे जाहीर केले होते. नाणार प्रकल्पावरून सेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. रविवारी  मुख्यमंत्र्यांनी  आरे मेट्रो कार शेडला विरोध करणाऱ्या २९ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाणारवासीयांना दिलासा दिला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून हा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, तो इतक्या लवकर होईल, असे कोणाला वाटले नव्हते. एकूणच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय निर्णयांचा धडका लावल्याचे दिसत आहे. गृह विभाग पोलिस अधीक्षकांना कळवेल


आजच्या निर्णयानंतर सदर गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृह विभाग जिल्हा पाेलिस अधीक्षकांना कळवेल व गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल.  सायंकाळी मंत्रालयात पर्यावरण, पर्यटन व कृषी विभागाची मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्याला छगन भुजबळ, सुभाष देसाई, जयंत पाटील आदी मंत्री हजर होते. त्या बैठकीत उद्धव यांनी नाणार आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.