आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री, उद्धव विमानाने एकत्र कोकणात; राणेंची मात्र ना!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोकणच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या लँडिग उद््घाटनासाठी मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री एकाच विमानातून जाणार असून नारायण राणे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्याचे टाळले आहे. नारायण राणे वेगळे चिपीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, राणे या कार्यक्रमात ठाकरेंसोबत मंचावर असतील. 


१२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळाच्या लँडिंगचा मुहूर्त असून मुख्यमंत्र्यांच्या या विमानाच्या लँडिगने मुहूर्त साधला जाणार आहे. या वेळी मुंबईतून एक २५ आसनी विमान चिपीला जाणार आहे. या विमानात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर एकत्र प्रवास करणार आहेत. नारायण राणेही या विमानातूनच चिपीला जातील, असे म्हटले जात होते. परंतु, राणे यांनी उद्धव ठाकरेंसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कार्यक्रमाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एका मंचावर आले होते. तब्बल १२ वर्षांनंतर हे दोघे एकत्र आले होते आणि दोघांनी एकमेकांची प्रशंसाही केली होती. परंतु आता मात्र नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर प्रवास टाळला असल्याचे समजते. 


श्रेय लाटण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू 
राणेंच्या निकटवर्तीय सूत्रांच्या मते, राणेंना केंद्रीय वाहतूक मंत्री वा मुख्यमंत्री कार्यालयातून कार्यक्रमाबाबत अद्याप काही सांगितलेले नाही. सुरेश प्रभू विदेशी जाणार असल्याचे समजते. त्यामुळे हा कार्यक्रमाबाबत शंका आहे. मात्र, राणे १२ सप्टेंबरला सिंधुदुर्गमध्ये आहेत. गृह राज्यमंत्री केसरकर यांनी १२ तारखेला मुख्यमंत्री व ठाकरे उद््घाटनाला येणार असल्याचे सांगितले. भाजप, शिवसेना आणि नारायण राणे या तिघांनाही चिपी विमानतळाचे राजकीय श्रेय घ्यायचे असल्याने यात वेगळेच नाट्य दिसू लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...