आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयावर पाटी, टाळेही ठोकले - Divya Marathi
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयावर पाटी, टाळेही ठोकले

दीप्ती राऊत

नाशिक - मंत्रालयात चकरा मारू की कॅन्सरग्रस्त मुलीसोबत रुग्णालयात थांबू या पेचात अडकलेले मुंबईचे जगदंबा पांडे, अपघातात गंभीर जखमी मुलाच्या उपचारासाठी दारोदार फिरणारे जळगावचे ईश्वर देशमुख, गिरीश महाजनांचे शिफारस पत्र घेऊन ६ महिन्यांपासून खेटे मारणारे महादू पाटील, आंबेगावचे पंढरीनाथ चासकर, श्रीगोंद्याचे संतोष जाधव... अशा तब्बल ६ हजार गरीब रुग्णांची चिंता आता वाढली आहे. राज्यातील सत्तासंकटामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला टाळे ठोकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर तेथे ‘कार्यालय बंद, कृपया चौकशी करू नये,’ अशी उपेक्षा करणारी पाटीही लावण्यात आली. मुळात निधी आटल्यामुळे गेल्या वर्षभरापासून या कक्षाकडील अनेक गरजू रुग्णांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. त्यात आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर हा कक्षच बंद झाल्याने या गरीब रुग्णांचे उपचार अडचणीत आले आहेत. शेवटच्या टप्प्यात मदत रखडली :


मधल्या काळात या कक्षाकडील निधीचा ओघ आटल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहिले होते. त्यासाठी राज्यभरातून (विदर्भ वगळून, कारण मावळत्या सरकारच्या काळात नागपूरला स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.) रुग्णांचे नातलगांनी मंत्रालयात अनेक चकरा मारल्या आहेत. त्यापैकी काहींची प्रकरणे अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर आली असताना, कक्ष बंद झाल्याने त्यांची सर्व मेहनत वाया गेली आहे. 

 

धनंजय मुंडेंचे राज्यपालांना साकडे :


विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले असून आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. ‘राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली अाहे, तरी आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा’, अशी मागणी मुंडेंनी केली आहे. 
 


काय आहे मदत निधी 
अपघात, दुर्धर आजारांवर खर्चिक उपचार गरीब रुग्णांना परवडत नाहीत. तातडीच्या कारणांसाठी मंत्रिमंडळाची परवानगी किंवा खात्यांचा निधीच्या मान्यतेची प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी या धर्मादाय संस्थेतून गरजूंना आर्थिक मदत केली जाते. मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या या कक्षाचे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील कार्यालय सध्याच्या राष्ट्रपती राजवटीत बंद करण्यात आले आहे. परिणामी या कक्षाकडे प्रलंबित असलेले राज्यभरातून आलेले गरीब रुग्णांचे अर्ज बासनात गुंडाळून ठेवले आहेत.मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला, अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले


> जगदंंबा प्रसाद पांडे यांनी मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावले. त्यांची मुलगी शिवानीवर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. अडीच लाखांचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी मदतीसाठी अर्ज केला होता.

> भडगावचे (जळगाव) महादू पाटील यांचीही हीच अवस्था आहे. अपघातावरील उपचारांसाठी त्यांना अाजवर लाखोंचा खर्च करावा लागला. काही शस्त्रक्रिया बाकी असल्याने त्यांनी मदतीसाठी कक्षाला अर्ज केला होता. 

>  पारोळ्याचे ईश्वर देशमुख म्हणाले, माझ्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी फेब्रुवारीत अर्ज दिला. मंत्रालयात अनेक चकरा मारल्या. फाइल या महिन्याच्या बैठकीत मंजूर होणार होती. पण आता काहीच शक्य होणार नाही असं वाटतंय.बातम्या आणखी आहेत...