आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील एका झाडाला रुमालाच्या साह्याने गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. दरम्यान, या मृत तरुणाच्या पत्नीची रविवारीच रुग्णालयात प्रसूती झाली होती. मात्र नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झालेला होता. या दु:खामुळे त्याने आत्महत्या केली. तर पोलिस कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे सुमारे तीन तास मृतदेह लटकलेलाच होता.
देवला बारका बारेला (वय-27, रा. रामजीपाडा, अडावद, ता.चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी उदियाबाई चौथ्या प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात दाखल झाली होती. तिची रविवारी दुपारी सिझेरियनने प्रसूती झाली. गर्भातून मृतावस्थेत मुलगा जन्मास आला होता. मृत देवला याची सासू ढेमाबाई बाळंतिणीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबून होत्या. यानंतर रविवारची रात्र देवलाने रुग्णालयाच्या परिसरात घालवली. रात्री तो वेड्यासारखे वागत असल्याचे अनेकांनी सांगितले. 'माझ्या भावाने आत्महत्या केली' असे तो ओरडून सांगत होता. काही वेळ तो रुग्णालयात झोपला. यानंतर रात्री 1 वाजेच्या सुमारास तो प्रसूती कक्षाकडे गेला होता. सकाळी 7 वाजता वॉर्ड क्रमांक 9 जवळ एका झाडावर रुमालाच्या साह्याने देवलाने गळफास घेतल्याचे आढळून आले. हे दृश्य पाहून रुग्ण व नातेवाइकांना धक्का बसला. रुग्णालयात ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
नवजात शिशूचा गर्भातच मृत्यू झाल्याने आले होते नैराश्य
देवला हा रात्री प्रसूती वॉर्डाकडे आला होता. तेव्हा महिला कर्मचारी हेमलता मराठे यांनी त्याला हटकले होते. दरम्यान, सकाळी 8.30 वाजता हेमलता यांनी देवलाचा झाडाला लटकलेला मृतदेह पाहिला. रात्री आलेला तरुण हाच असल्याची खात्री झाली. त्यांनी वॉर्डात जाऊन चौकशी केली. तसेच देवला याची सासू ढेमाबाई यांना मृतदेह पाहण्यासाठी आणले. ढेमाबाई यांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला. या वेळी मृतदेहाची ओळख पटली.
पत्नीपासून दूर ठेवली माहिती...
दरम्यान, सिझेरियन तसेच मृत बालकास जन्म दिल्यानंतर देवला याची पत्नी उदियाबाईची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी तिला सांगण्यात आली नाही. पावरा दांपत्याला एक मुलगा व दोन मुली आहेत. उदियाबाईची रविवारी चौथी प्रसूती झाली.
पोलिस उशिरा आल्याने तीन तास लटकला मृतदेह; अनेकांनी मोबाइलमध्ये घेतले फोटो
रुग्णालयाच्या आवारात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी 7 वाजता उघडकीस आली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाने जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिस सकाळी 10 वाजता घटनास्थळी आले. पोलिस तीन तास उशिराने आल्यामुळे मृतदेह तशाच अवस्थेत लटकत होता. शेकडो लोकांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाहिला. अनेकांनी मोबाइलमध्ये फोटोही काढले. रुग्णालयापासून अवघ्या दीड-दोन किलोमीटर अंतरावर पोलिस ठाणे असूनही पोलिसांनी घटनास्थळी येण्यास तीन तास लावले. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.